WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आषाढी वारीसाठी खारवी समाजाची श्रीराम पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना


आषाढी वारीसाठी खारवी समाजाची श्रीराम पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना

रामपूर गुढेफाटा येथे वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत

रामपूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नवानगर, धोपावे, वेलदूर, असगोली आणि गुहागर परिसरातील खारवी समाजाची पारंपरिक श्रीराम पायी दिंडी विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि हरिनामाच्या भजनात तल्लीन होत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यंदाचे या दिंडीचे ३० वे वर्ष असून, या परंपरेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव यंदाही अनुभवायला मिळाला.

दिंडी रामपूर गुढेफाटा येथे पोहोचल्यावर रामपूर-मार्गताम्हाणे पत्रकार संघाच्या वतीने वारकऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांच्यासह बाबा पाटेकर, सुरज पाटेकर, सुजित पाटेकर, डॉ. जगदीश पाटेकर, अशोक साळुंखे सर आणि कृष्णा घाग यांनी वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या वारीला शुभेच्छा दिल्या.
स्वागतानंतर बाबा पाटेकर यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली. अल्पविश्रांती घेतल्यानंतर दिंडी पुढील मुक्कामासाठी मालघरच्या दिशेने रवाना झाली.

यंदाच्या श्रीराम पायी दिंडीत खारवी समाजातील सुमारे ८० वारकरी सहभागी झाले आहेत. भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद, मुखी विठ्ठलनाम आणि डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. महिला हरिनामाच्या भजनात तल्लीन झालेल्या दिसून आल्या.

यावेळी सुवर्णा पाटेकर यांच्या हस्ते तुळशीची आरती करण्यात आली. विठ्ठलभक्ती, समाजातील एकोप्याची भावना आणि अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली वारीची परंपरा यांचे दर्शन या दिंडीतून घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!