लोटे औद्योगिक परिसरातील रासायनिक सांडपाणी प्रकरण; उच्चस्तरीय चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक परिसरातून रासायनिक सांडपाणी गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये, शेतीमध्ये तसेच खाडी परिसरात पसरल्याच्या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित उद्योग व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.
यासंदर्भात दलवाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री ना. उदय सामंत तसेच पर्यावरण व हवामान बदल मंत्री ना. पंकजा मुंडे यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या गंभीर पर्यावरणीय प्रश्नावर सखोल चर्चा करण्यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याची वेळही त्यांनी मागितली आहे.
निवेदनात लोटे औद्योगिक परिसरातून रासायनिक सांडपाणी बाहेर पडल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याचा, शेतीचे मोठे नुकसान होण्याचा तसेच खाडी परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून नेमके कारण शोधण्यात यावे, दोषी उद्योग तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी दलवाई यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
पर्यावरणाचे संरक्षण, नागरिकांचे आरोग्य आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे लोटे औद्योगिक परिसरातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडूनही या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.











