खोपड-कालुस्ते पूल जोडरस्त्यांच्या कामासाठी 1 मे रोजी ग्रामस्थांचे आंदोलन
संयम संपत चालल्याची तीव्र भावना
चिपळूण : खाडीपट्ट्यातील कोंढे-करंबवणे या महत्त्वाच्या मार्गावरील खोपड-कालुस्ते लहान पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले, तरीही पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील ग्रामपांयतींनी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी पूल ठेकेदारासमोर हतबल झालेले असल्याने भिले, करंबवणे, मालदोली तसेच परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आता संतप्त ग्रामस्थांनी 1 मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खाडीपट्ट्यातील असंख्य गावांना जोडणाऱ्या कोंढे-करंबवणे मार्गावरील खोपड-कालुस्ते नदीवरील लहान पूल अलिकडच्या काळात कमकुवत झाला होता. त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून या पुलासाठी कोटीहून अधिका निधी मंजूर झाला. या पुलाच्या ठेकेदाराला 23 सप्टेंबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने पुलाचे मुख्य बांधकाम वेळेत पूर्ण केल्याचे सांगितले असले, तरी पोच मार्गाचे आवश्यक खडीकरण व डांबरीकरण आजतागायत करण्यात आलेले नाही. गतवर्षी पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन देऊनही ठेकेदाराने दखल घेतली नसल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
याबाबत कालुस्ते बुद्रुक ग्रामपंचायतीने 8 जानेवारी 2026 रोजी लेखी पत्राद्वारे रोजगार हमी योजना कार्यालयाकडे तक्रार नोंदवली आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी उपविभागीय कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करून अपघाताची शक्यता व्यक्त केली आहे. रस्त्याची दयनीय अवस्था आणि अपूर्ण पोच मार्गामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी (रोहयो उपविभाग चिपळूण) यांच्या वतीने ठेकेदारास तातडीचे पत्र पाठवून उर्वरित काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा निविदेच्या अटी-शर्तींनुसार पुढील कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र सदर ठेकेदाराने त्या पत्रालाही केरी टोपली दाखवली. दरम्यान, प्रशासनाच्या वारंवार सूचनांकडे ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता 1 मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.












