चिपळुणात भरणार छोट्यांची जत्रा
विद्याभारती तर्फे शिशुनगरीचे आयोजन
चिपळूण – चिपळूण शहरासह तालुक्यातील चिमुकल्यांसाठी आनंद, खेळ आणि शिक्षणाचा अनोखा संगम साधण्याकरिता विद्याभारती संस्थेच्या वतीने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी शिशुनगरीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात विज्ञानातील जादूचे प्रयोग, चित्रांमधून गोष्टी, गमतीशीर कोडी आणि गणितातील मजा अशा अनेक आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. स्वा. सावरकर मैदान बहादुरशेखनाका, चिपळूण येथे ही नगरी साकारत आहे. चिमुकल्यांसाठी ही जत्रा फनफेअर ठरणार आहे.

मल्लखांब आणि जादूचे प्रयोग हे या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरणार आहे. या शिशूनगरीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मुलांना फक्त पाहण्याची संधी नाही, तर स्वतः प्रयत्न करून अनुभव घेता येतीत असे उपक्रमही असतील. प्रत्येक कोपऱ्यात नवा खेळ, नवा धडा आणि नवा आनंद मिळेल. हा कार्यक्रम फक्त मनोरंजन नसून संस्कार, ज्ञान आणि खेळ यांचा सुंदर संगम आहे. सर्वांनी या शिशूनगरी मध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्याभारती संस्थेतर्फे करण्यात आले आहे.












