उक्ताड येथील वाहनतळाचे आरक्षण बदलणार?
गेली चार वर्षे वापराविना पडून, नगर पालिकेला शून्य उत्पन्न
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची पाहणीनंतर माहिती
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे उक्ताड येथे असलेले अटलबिहारी वाजपेयी वाहनतळ बाजारपेठेपासून दूर असल्याने गेल्या चार वर्षांपासून जवळपास वापरात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या वाहनतळाचे आरक्षण बदलून नगर पालिकेला उत्पन्न मिळवता येईल का, याबाबतचा विषय आगामी सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येणार असल्याची भूमिका नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केली.
मंगळवारी सकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी उक्ताड येथील वाहनतळाची पाहणी केली. माजी नगरसेवक आशिष खातू, महंमद फकीर, या वेळी बांधकाम विभागाचे श्री. डफळ, श्री. निंबाळकर, बांधकाम मिस्त्री रविकांत सातपुते, आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान नगराध्यक्षांनी सांगितले की, ही मालमत्ता नगर पालिकेची असून तिन्ही बाजूंनी गेट नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने गेट बसवून या मालमत्तेची योग्य निगा राखावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वाहनतळ म्हणून उभारण्यात आलेला हा परिसर प्रत्यक्षात वाहनचालकांच्या उपयोगात येत नसल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. उक्ताड येथे वाहने लावून नागरिक बाजारपेठेत येण्याची शक्यता कमी असल्याने वाहनतळाचा उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे या ठिकाणी लग्न समारंभ, सभा, विविध कार्यक्रम आदी खाजगी उपक्रमांना परवानगी देऊन नगर पालिकेच्या उत्पन्नात वाढ करता येईल का, याबाबत विचारमंथन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
लवकरच होणाऱ्या नगर परिषद कौन्सिल बैठकीत हा विषय सभागृहासमोर ठेवून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी स्पष्ट केले.











