WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ ची डरकाळी


सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ ची डरकाळी

कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास

चिपळूण : कोयना अभयारण्य येथील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली ‘हिरकणी’ (एसटीआर 06) वाघीण आता चिपळूणच्या माथ्यावरील जंगलांच्या दिशेने प्रवास करत असून तिच्या हालचाली नांदिवसे परिसरातील डोंगरकपारीत आढळून आल्या आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सेंटरकडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वनविभाग तातडीने सतर्क झाला आहे.

बुधवारी सायंकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदिवसे गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि खबरदारीच्या सूचना दिल्या. डोंगराळ भागात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच रात्री विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले.

पेंचमधून सह्याद्रीत ‘हिरकणी’ची एंट्री
पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नागलवाडी परिक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एसटीआर 06 या वाघिणीला पकडण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर 6 फेब्रुवारीला तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आणि 7 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कोयना अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले. त्यानंतर ‘हिरकणी’चा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला. यापूर्वी एसटीआर 03 हा ‘बाजी’ नर वाघ तसेच ‘तारा’ आणि ‘चंदा’ या वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल आहेत. आता ‘हिरकणी’च्या समावेशामुळे प्रजननवृद्धीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

1165 चौ.कि.मी.चा जैवविविधतेने समृद्ध परिसर
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेला सुमारे 1165 चौरस किलोमीटरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आणि अनेक दुर्मिळ प्रजातींचे अधिवास असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या परिसरात वाघांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवास मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामस्थांना सूचना; अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन
‘हिरकणी’चा वावर पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वाघिणीला कोणताही त्रास न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाघिणीच्या हालचालींवर सातत्याने जीपीएसद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, ‘हिरकणी’च्या नांदिवसे परिसरातील एन्ट्रीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पुढील काही दिवस या परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!