WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

अंजणारी घाटातील भीषण ट्रेलर अपघातात चालकाचा जीव वाचला


अंजणारी घाटातील भीषण ट्रेलर अपघातात चालकाचा जीव वाचला

🔴रत्नागिरी पोलिसांची तत्परता

🔴बचावकार्यात अग्निशमन दल, १०८ रुग्णवाहिका व स्थानिकांचेही मोलाचे सहकार्य

लांजा : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटातील बसस्टॉप परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण ट्रेलर अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा जीव रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या तात्काळ आणि धाडसी बचावकारवाईमुळे वाचला. पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी चालकाला सुखरूप बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेने जात असलेला ट्रेलर (क्र. एमएच-४६-डीसी-२७६३) अंजणारी घाटातील बसस्टॉपजवळ पोहोचला असता अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळून भीषण अपघात झाला.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. चालक राजकुमार रामकिशोर साहू (वय ३५, रा. लोही, जि. रिवा, मध्य प्रदेश) हा वाहनाच्या केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकून पडला होता. तसेच ट्रेलरमधील कोटेड कॉईल मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनेची माहिती डायल ११२ वर प्राप्त होताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मैनदाड तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता पोलिसांनी जेसीबी, अग्निशमन दल आणि इतर बचाव यंत्रणांच्या मदतीने ट्रेलरची केबिन उघडून चालकाची सुखरूप सुटका केली.
त्यानंतर जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, लांजा पोलिसांनी तातडीने प्रभावी वाहतूक नियोजन करून अल्पावधीतच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

या संपूर्ण बचाव मोहिमेत लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे पथक, १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा, अग्निशमन दल, जेसीबी सेवा, स्थानिक नागरिक तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोलाचे सहकार्य केले.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या तातडीच्या प्रतिसादामुळे जखमी चालकाचा जीव वाचविण्यात यश आले. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाने दाखविलेली तत्परता, समन्वय आणि मानवतावादी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!