हरित क्रांतीसाठी कान्हे ग्रामपंचायतीचा पुढाकार
सह्याद्री निसर्ग मित्र च्या सोबतीने देशी रोपांची लागवड
एक झाड स्वतःसाठी उपक्रम
चिपळूण – पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढीसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कान्हे व सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हे गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहात देशी रोपांची लागवड करण्यात आली. एक झाड स्वतःसाठी लावून त्याची जोपासना करण्याचा निर्धार करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत ग्रामदैवत मंदिर परिसर, रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमी, कबरस्तान तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी वड, पिंपळ, औदुंबर, ताम्हण, बकुळ, बहावा, बेल, सातवीण, जांभूळ, आवळा, चिंच आदी पर्यावरणपूरक व दीर्घायुषी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देशी वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन या वृक्षांची निवड केली.
या उपक्रमासाठी आवश्यक सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने देशी रोपे उपलब्ध करून दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांनी देशी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व सांगून प्रत्येकाने लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत कान्हेच्या प्रशासक वैष्णवी ताम्हणकर, ग्रामपंचायत अधिकारी योगिता घाग- देसाई, नीता जठार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधीर जाधव, सुनील मोडक , अरुण मोडक, खांबे कुटुंबीय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ अन्वर कान्हेकर व ग्रामपंचायत कर्मचारी अमर कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यातही लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











