सोनगाव ग्रामस्थांच्या मोर्चाला कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा
२७ जुलै रोजी चिपळूणमध्ये धडक मोर्चा; प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाईची मागणी
चिपळूण, दि. २४ : सोनगाव परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) उपप्रादेशिक कार्यालयावर सोमवार, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या धडक मोर्चाला कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
समितीचे समन्वयक भरत लब्ध्ये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोनगाव परिसरातील प्रदूषण, दूषित पाणी, पर्यावरणीय हानी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप प्रभावी आणि ठोस कारवाई झालेली नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे.
केवळ कागदोपत्री नोटिसा बजावून जबाबदारी पूर्ण झाल्याचे दाखविण्यापेक्षा, पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या दोषी उद्योगांवर कायद्यानुसार कठोर आणि प्रत्यक्ष कारवाई करणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
समितीच्या मते, पर्यावरण संरक्षण हा केवळ सोनगावपुरता मर्यादित नसून संपूर्ण कोकणच्या जनतेच्या अस्तित्वाशी संबंधित विषय आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि प्रदूषणमुक्त परिसर हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याने या जनआंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळणे आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने पर्यावरणप्रेमी नागरिक, शेतकरी, युवक, सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
“प्रदूषणमुक्त, निसर्गसंपन्न आणि सुरक्षित कोकण” हे उद्दिष्ट समोर ठेवून हा लढा सुरू असल्याचे समितीने नमूद केले असून, प्रशासनाने पर्यावरण संरक्षणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, समितीचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री हुसेन दलवाई यांनीही या मोर्चाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.












