WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

शिरवली-येलोंडेवाडी धरणाचे काम पूर्ण


शिरवली-येलोंडेवाडी धरणाचे काम पूर्ण

प्रकल्पात १५.२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा

रामपूर (अनिलकुमार जोशी ) : चिपळूण तालुक्यातील रामपूर परिसरातील शिरवली-येलोंडेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम अखेर पूर्ण झाले असून, सुमारे २२५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात १५.२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरू लागल्याने परिसरातील भूजल पातळी वाढण्यास तसेच भविष्यातील पाणी उपलब्धतेस मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिरवली, येलोंडेवाडी, देवखेरकी आणि नारदखेरकी या परिसराशी संबंधित असलेल्या या प्रकल्पामुळे सुमारे १४२ हेक्टर क्षेत्राचा लाभ होणार आहे. धरणाची लांबी ७०० मीटर तर उंची ४५ मीटर आहे. या प्रकल्पाची निविदा सन २००७ मध्ये काढण्यात आली होती. विविध टप्प्यांतील कामांनंतर २०१८ ते २०२६ या कालावधीत धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

या प्रकल्पासाठी भूसंपादनासह एकूण २२५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. प्रकल्पासाठी देवखेरकी येथील ४७ आणि शिरवली-येलोंडेवाडी येथील ८२, असे एकूण १२९ नागरिकांचे स्वेच्छा पुनर्वसन करण्यात आले आहे.
दरम्यान, धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेर असलेल्या १०९ घरांबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. पाणलोट क्षेत्रातील पाणी वाढल्यास या घरांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नुकसानभरपाई देऊन या कुटुंबांचेही स्वेच्छा पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

प्रकल्पाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने देवखेरकी सुतारवाडी व शिरवली गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. देवखेरकी सुतारवाडी येथे जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीबाबत चिपळूण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच शिरवली गावात ग्रामस्थांच्या सोयीसाठी डांबरी रस्त्यांचीही उभारणी करण्यात आली आहे.

येलोंडेवाडी ग्रामस्थांनी मात्र आपल्या गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी केली आहे. प्रकल्पामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून भविष्यात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीही या धरणाचा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रकल्पाची माहिती प्रकल्प अधिकारी खोत यांनी दिली. प्रकल्पाचे कार्यालय नारदखेरकी येथे असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!