WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला


वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

चिपळूण : शहरातील बाजारपुलावरून एका अज्ञात तरुणाने शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना घडली. यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाकडून तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली. दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह आढळून आला. रिजवान गयासुद्दीन परकार (रा. २५, मूळ रा. कालुस्ते, सध्या रा. गोवळकोटरोड, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने पुलावरून शनिवारी रात्री नदीत उडी घेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आणि तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुलावर या तरुणाची चप्पल आणि घड्याळ सापडले. नदीच्या प्रवाहाचा वेग आणि रात्रीची वेळ यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. तर या घटनेमुळे बाजारपुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कालांतराने शोध मोहीम थांबविण्यात आली.

अखेर रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह आढळून आला. यानंतर या तरुणाचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर गोवळकोटरोड येथील स्मशानभूमीत दफनविधी झाला. रिजवानच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

या घटनेची चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र, या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!