रत्नागिरीतील ज्येष्ठ शिक्षिका सुचिता साळवी यांचे निधन
रत्नागिरी : फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुचिता विश्वनाथ साळवी यांचे सोमवार दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता कुवारबांव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी शिक्षण विस्तार अधिकारी कै. बा. सी. साळवी गुरुजी यांच्या स्नुषा होत. तसेच शिक्षणाधिकारी दिवाकर तुकाराम देसाई हे त्यांचे व्याही असून, चिपळूणचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांच्या त्या सासू होत.
सौ. साळवी यांनी रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध फाटक हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून अनेक वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या अध्यापन कौशल्यामुळे तसेच सहशालेय कार्यक्रमांतील सक्रिय सहभागामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. विद्यार्थिप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.













