ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
सामाजिक, वैचारिक क्षेत्रावर शोककळा
पुणे, दि. १८ जुलै : ज्येष्ठ समाजवादी, पुरोगामी विचारवंत, युवक क्रांती दल (युक्रांद)चे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी (१८ जुलै) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून समाजवादी व गांधीवादी चळवळीतील एक प्रभावी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सप्तर्षी यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने पुण्यातील एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्यभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि त्यांच्या असंख्य अनुयायांनी शोक व्यक्त केला. समाजातील परिवर्तनासाठी आयुष्यभर झटणाऱ्या एका निष्ठावान समाजवादी विचारवंताच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी युवकांना संघटित करून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने युवक क्रांती दल (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये सामाजिक भान, लोकशाही मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि परिवर्तनवादी विचार रुजविण्याचे कार्य केले. ते प्रभावी लेखक, अभ्यासू विचारवंत आणि ओजस्वी वक्ते म्हणूनही ओळखले जात होते. समाजातील विषमता, अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात त्यांनी सातत्याने परखड भूमिका मांडली.
डॉ. सप्तर्षी यांच्या पार्थिवाचे २० जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पुण्यातील गांधी भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ज्येष्ठ समाजवादी नेता, प्रगल्भ विचारवंत आणि परिवर्तनवादी चळवळीचा खंबीर आधारस्तंभ गमावला असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.











