WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

गृहीत धरल्यानेच खेर्डीने दाखवला हिसका – जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव


गृहीत धरल्यानेच खेर्डीने दाखवला हिसका – जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव

 

चिपळूण – ज्यांना गृहीत धरून राजकारण करीत होतात, त्याच खेर्डीने हिसका दाखविला. यापुढे सुधारला नाहीत तर उद्या लोक तुम्हाला कायमचे घरात बसवतील हे लक्षात ठेवा. आम्हीही तुमच्याच शाळेत शिकलो आहेत. तुम्ही काय करू शकता हे माहीत आहे, असा राजकीय टोला भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महायुतीच्या विजयी उमेदवार सत्कार सोहळ्यात लगावला.

खेर्डी येथील प्रशांत यादव यांच्या साई दरबार मंदिरासमोरील मैदानावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हाभरातून विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष यादव म्हणाले, नेहमी काम करणार्‍यावर टीका होत राहते. आमच्यावर तर रोज टीका सुरू आहे. ज्या वेळेस टीका होते, नावं ठेवली जातात, त्यावेळी आपण योग्य ट्रॅकवर आहोत हे लक्षात ठेवावे. ज्या वेळेस टीका होणार नाही त्या वेळेस आपण कुठेतरी चुकतोय हे समजून जावे. ज्याच्यावर टीका होते त्याचे भवितव्य उज्ज्वल असते. आमच्यावर सुरू असलेल्या टीकेला कधीही उत्तर दिले नाही. मात्र, पक्षाने दखल घेत आज जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे टीकाकारांना आपण धन्यवाद देतो. जोपर्यंत आपण जमिनीवर राहून कार्यकर्त्यांसोबत असतो तेव्हा कार्यकर्ता विसरत नाही. या निवडणुकांत अनेक दिग्गज पराभूत झाले. मात्र, नेता आणि कार्यकर्ता असा आमचा समन्वय होता. म्हणूनच विजयाचे व यशाचे श्रेय मिळाले. या यशाची जाणीव ठेवून आज कार्यकर्ते, पदाधिकारी व विजयी उमेदवारांचा सन्मान आणि आभार समारंभ होत आहे. आपल्या अडीअडचणी, संघर्षाच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ दिली. मी तत्त्वांशी, विचारांशी एकनिष्ठ राहून नेहमीच राजकीय भूमिका घेतली आहे.

कार्यकर्ता, गावाला कमीपणा येईल असे काहीही केले नाही. म्हणूनच निवडणुकीत मोठे यश मिळाले. भविष्यात एकत्र राहून काम करणार्‍याच्या पाठीशी उभे राहा. वाद, टिकेपेक्षा पक्षाचे काम मोठे आहे आणि तेच पुढे न्यायचे आहे. निवडणूक दरम्यान अनेक उमेदवारांना कल्पना नसेल की, आमची टीम पहाटे उशिरापर्यंत कसे राजकीय काम करीत होती. मतदारांशी संपर्क व बैठका कशा घेतल्या जात होत्या. त्यातूनच आजचे यश दिसून येत आहे. कार्यकर्ता दुखावला जाणार नाही, त्याला योग्य सन्मान मिळायला हवा. ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्याच ताकदीने आज राजकीय प्रवाहात आपण यशस्वी होत आहोत याचे भान आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची चिंता नाही. मात्र, बॅनरबाजीचे भांडवल करायला ज्यांनी सुरुवात केली त्यांना निवडणूक काळात उत्तर देऊ. आपल्या या यशात कार्यकर्त्यांसोबत वाशिष्ठी डेअरी, चिपळूण नागरी पतसंस्था व कुटुंब माझ्या पाठीशी राहिले, अशा भावना यावेळी यादव यांनी व्यक्त केल्या.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!