चिपळुणात मुख्यमंत्री पंचायतराज अभियानात तीन गावात मोठी चुरस
चिपळूण : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरावर निवड झालेल्या २८ ग्रामपंचायतींचे मुंल्याकन अंतिम टप्प्यात आले आहे. यातून तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीस १५ लाख तर जिल्हास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला ५० लाखाचे बक्षिस मिळणार आहे. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी तिन गावात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील समितीची टीम चिपळूण तालुक्यात मुल्यांकन करत आहे. ग्रामपंचायत कामकाजाला गती मिळावी, पारदर्शक कारभार व्हावा, गावस्तरावर शासनाच्या प्रत्येक विभागाने दिलेले उद्दीष्ट पुर्ण करावे, लोकसहभागातून विकास कामांना चालना मिळावी, नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले जावेत. यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले. गेले वर्षभर या अभियानाचे काम सुरू आहे. अभियान कालावाधीत केलेल्या कामाचे मुल्यांकन करण्याचे काम सध्या राज्यभरात सुरू आहे. यासाठी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतिक चनावार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. जंजाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. धोंडगे, सहायक श्री. महाभंरे यांचा सहभाग असलेली समिती चिपळूण तालुक्यात दाखल झाली आहे. गेल्या दोन दिवसात या समितीने तालुक्यातील वालोपे, खांदाटपाली, दळवटणे, पेढांबे, पिंपळी, वेहेळे, धामणवणे, भोम, मालघर, पाथर्डी, पाचाड, आदी गावांचे मुल्यांकन केले आहे. या अभियानात केलेल्या कामानुसार ग्रामपंचायतींनी गुण जाहीर केले आहेत. या जाहीर केलेल्या गुणांची आणि त्यातील कामांची पडताळणी समिती करत आहे.
ग्रामपंचायत इमारत, शोषखड्डे, रोजगार हमीचे कामे, शाळा, अंगणवाड्या, सोलारचा वापर, सिसीटिव्ही यंत्रणा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे, घरपट्टी व पाणी पट्टी वसुली, संकलीत केलेली लोकवर्गणी व त्यातून केलेले काम आदीं विविध बाबींची तपासणी केली जात आहे. या बाबींची पडताळणी करून तालुक्यात पहिल्या तिन ग्रामपंचायतींची निवड ही समिती करणार आहे. गट विकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या समिती सोबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भास्कर कांबळे, मिलींद केळसकर, स्वप्नील कांबळे, डी वाय कांबळे हे काम पाहत आहेत.
तालुकास्तरावरील प्रथम ग्रामपंचायतीस १५ लाख, द्वितीय १२ लाख आणि तिसऱ्या क्रमांकावरील ग्रामपंचायतीस ८ लाखाचे बक्षिस मिळणार आहे.
गुणांकन वाढण्यासाठी पंचायत समितीचे मेहनत
गटविकास अधिकारी सौ. उमा घार्गे -पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी संघटना, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी तपासणी काम पूर्ण करण्यासाठी व तालुक्याचे गुणांकन वाढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.












