रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त सापडेना!
चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळी -साखरवाडी पेट्रोलपंप येथील रस्ता नेहमी चर्चेचा व वाहकधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. आवाज उठवला कि तात्पूर्ती डागडूगी केली जाते. रस्त्यावर खड्डे पडलेला भाग लवकर दुरुस्त व्हावा यासाठी यावर्षी तर प्रवासी पावसाळा संपल्यापासून आवाज उठवत आहेत. मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चिपळूण-गुहागर मार्गावरील उक्ताड बायपास ते मिरजोळी साईमंदिर पर्यंतचा रस्ता नेहमी खड्डेमय असतो. दर वर्षी रस्ता डांबरीकरण केले जाते, पण ते अल्पजीवी ठरते. पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी रस्यावर येते. त्यामुळे पावसाळ्यात यातूनमार्ग काढणे कठीण असते. तसेच रस्ता पूर्णपणे उखडला जातो. प्रवासी, वाहनचालक यांनी ओरड सुरु केली कि तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र गटार किंवा पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही बाबत ठोस उपाययोजना केली जात नाही.
यावर्षी या मार्गावरील हा त्रासदायक भाग लवकर दुरुस्त व्हावा यासाठी जागृत नागरिकांकडून जोरदार प्रयत्न सुरवातीपासून झाले. त्यामुळे येथे खडी व अन्य साहित्य येऊन पडले. कामाला सुरुवात झाली. मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात येताच पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना धारेवर धरले. काम दर्जेदार व्हावे अशी तंबी दिली. मात्र तेव्हापासून आजतगायत या रस्त्याच्या कामाला मुहूर्त काही सापडेना. या मार्गावरून प्रवास करणारे ज्येष्ठ पत्रकार जाफरभाई गोठे यांच्याशी आज या ठिकाणी अनेक प्रवासी व वाहकचालकांनी भेटून संबंधित खात्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. खड्डेमय, अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याचे काम लवकर झाले नाही तर तीव्र प्रतिक्रिया उमटतील याचा विचार करुन संबंधितानी वेळीच रस्ता पूर्ण करावा असा इशारा श्री.गोठे यांनी दिला आहे.













