शेतीपुरक व्यवसायात माजी सैनिकाची भरारी
टेरव येथील सुरेश म्हालीम यांची आदर्शवत कामगिरी
चिपळूण : शेळीपालन, कुक्कुटपालनासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. परंतु बेरोजगार तरूण त्याचा लाभ घेताना दिसत नाहीत. मात्र टेरव येथील माजी सैनिक सुरेश म्हालीम यांनी सेवानिवृत्तीनंतर शेळीपालन व्यवसायाची कास धरली. सुरवातीलाच झालेला मोठा तोटासहन करीत या सैनिकाने येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात केली. नियमित शिस्तीने आणि कष्टाने या व्यवसायात पुन्हा जम बसवत एक आदर्श निर्माण केला आहे.
टेरव येथील सुरेश बाबू म्हालीम यांनी हलाखीच्या परिस्थितीतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते १९९१ ला कोल्हापूर येथे सैन्यात भरती झाले. सैन्यदलात त्यांनी पंजाब, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, जबलपूर, लडाख, लेह आदी विविध ठिकाणी काम केले. शिस्तीने बजावलेल्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते २०१९ ला कोरोना कालावधीतच सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर पुन्हा दुसरीकडे नोकरी करण्याचा विचार नव्हता. व्यवसाय करण्याच्या हेतूने त्यांनी शेळीपालनाची निवड केली. सध्या ते खेर्डी येथे वास्तव्याला आहेत. टेरव हे त्यांचे गाव असून तेथील स्वतःच्या जमिनीत शेळीपालनासाठी बंदिस्त शेड उभारण्याचे निश्चित केले. सुरेश म्हालीम यांचा एक भाऊ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तर दुसरे बंधू फॅब्रीकेशनचा खेर्डीत व्यवसाय करीत असून चौथा भाऊ पुण्यात नोकरीला आहे. या भावडांच्या सहकार्यातून टेरव तांदळेवाडी येथील घराजवळील शेतजमिनीत दुमजली लोखंडी बंदिस्त ५० बाय ५० फूट आकाराची शेड उभारण्यात आली. सुरवातीला आफ्रीकन बोअर जातीची ५ बोकडे व शेळी विकत घेतली. यातील एका शेळीचे वजन ८० ते ९० किलो होते. तर एका शेळीची किंमत एक लाख रूपये होती. या बोकडाची परदेशात जास्त विक्री होत असल्याने चांगला जम बसेल अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना कालावधीत दोन वर्षात या बोअर आफ्रीकन जातीच्या बोकड व शेळींना चांगला दर मिळाला नाही, विक्रीलाही अडचणी आल्या. मात्र सुरेश म्हालीम या लढवैय्या माजी सैनिकाने हा धक्का पचवला. शेळीपालानाची कास न सोडता पुन्हा यात जम बसवण्याचा निश्चय केला. यात तिघा भावांनी खंबीर साथ दिली. चौघा भावंडानी पुन्हा शेळीपालनाचा अभ्यास करून भिवंडी येथून स्वजत जातीची शेळी व बोकड आणले. सध्या त्यांच्याकडे ३५ बोकड व शेळ्या आहेत.
शेळीपालनाच्या जोडीला त्यांनी कुक्कुटपालन सुरू केले. कधी ५० कधी १०० पक्षी आणून त्याची जोपासना केली. कोंबड्या मोठ्या झाल्यावर बहुतांशी विक्री जागेवरच होत राहिली. शेळीपालनात सुरवातीला पशुखाद्यावर जास्त खर्च येत असल्याचे निदर्शनास आले. यावर मात म्हणून त्यांनी शेतातच शेवगा लागवड केली. त्याचा चाऱ्यासाठीही उपयोग झाला. सकाळी शेडमधील स्वच्छता झाल्यावर ते शेळ्यांना चरायला नेतात, त्याचबरोबर जंगलातील झाडपाला गोळा करून आणतात. शेळ्यांकडे नियमित लक्ष असल्याने म्हालीम यांना बोकड व शेळ्यांच्या आरोग्याची चांगली माहिती अवगत झाली. शेळ्यांना आलेले आजारपण ते त्वरित ओळखून त्यावर इलाज करतात. कधी कधी ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतात. या व्यवसायासाठी त्यांनी शक्य असतानाही एक रूपयाचे देखील शासकीय अनुदान घेतलेले नाही. निवृत्त पोलीस बंधू व लहान भावाची पत्नी त्यांना या व्यवसायात मदत करतात. म्हालीम कुटुंबाने कष्टाने आणि नेटाने शेळीपालन व्यवसाय जपला आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. शिस्तीने आणि कष्टाने शेळीपालन, कुक्कुटपालन केल्यास कुटुंबाला आर्थिक उभारी मिळू शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.












