वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
चिपळूण तालुक्यात खळबळ
चिपळूण : तालुक्यातील गाणे गुरववाडीच्या वर असणाऱ्या माळ परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून वणव्यात होरपळून एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तारा तुकाराम वाघे असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारा तुकाराम वाघे या २७ मार्चपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या शोधासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न सुरू होते. त्या काही अंशी मनोरुग्ण होत्या आणि अनेकवेळा घरातून निघून जात असत तसेच परत येत असत. याचदरम्यान गाणेच्या जंगलात चार दिवसांपूर्वी वणवा लागला होता. याच दरम्यान एक व्यक्ती जंगलातून लाकडे आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला एक मृतदेह जळल्या स्थितीत दिसून आला. मात्र साडीवरून त्यांनी हा मृतदेह तारामती वाघे हिचा असल्याचं ओळख पटली. त्यांनी तातडीने यासंदर्भात अलोरे-शिरगाव पोलीस यांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सदरच्या मृतदेहावर शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. वणव्याच्या तीव्रतेमुळे त्या होरपळून मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, मुलगी व आठ नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वणव्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.











