राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जतीन भोसले याला कांस्यपदक
पुणे : बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात १६ व १७ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य सिनियर व लोअर एज ग्रुप ॲक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६” स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या Aquatechniques Ratnagiri Swimming Club चा जलतरणपटू जतीन किशोर भोसले याने अंडर-12 वयोगटातील ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले. राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पदक मिळविल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Swimming Federation of India (SFI) यांच्या मान्यतेखाली पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. राज्यातील उदयोन्मुख जलतरणपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जाते.
जतीनने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. त्याच्या यशामागे प्रशिक्षक विवेक विलाणकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.
जतीनच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून तसेच क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही तो उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.










