WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

गोतस्करांवर आता थेट ‘मकोका’


गोतस्करांवर आता थेट ‘मकोका’

🔴अवैध गोवंश वाहतुकीविरोधात राज्यभर कडक कारवाई

🔴सीमांवर संयुक्त तपासणी नाके उभारणार

मुंबई : राज्यातील गोतस्करी आणि अवैध कत्तलखान्यांवर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता गोतस्करांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई होणार आहे.

राज्यात २०१५ पासून गोहत्या बंदी कायदा लागू असला, तरीही काही भागांतून गोतस्करीच्या घटना समोर येत असल्याने सरकारने आता अधिक कडक भूमिका घेतली आहे. गृह विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, गोवंशाची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तलखाने आणि बेकायदेशीर कत्तली रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.

सीमांवर संयुक्त तपासणी नाके
राज्याच्या सीमांवर पोलीस आणि परिवहन विभागाच्या संयुक्त पथकांकडून तपासणी नाके उभारले जाणार आहेत. संशयित वाहनांची तपासणी करून गोवंश वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार असून, यासाठी स्थानिक प्रशासनालाही सक्रिय करण्यात आले आहे.

‘डायल ११२’वर नागरिकांना तक्रारीची सुविधा
गोतस्करी किंवा बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात आता नागरिक थेट ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर तक्रार करू शकणार आहेत. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांची थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

हिंदू संघटनांच्या मागण्यांनंतर निर्णय
गेल्या काही महिन्यांत विविध हिंदू संघटनांकडून राज्य सरकारकडे गोतस्करी, गायींची अवैध वाहतूक आणि अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. काही ठिकाणी यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर संविधानातील तरतुदी आणि विद्यमान कायद्यांच्या आधारे गोवंश संरक्षणासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गोतस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गोवंश संरक्षणाला अधिक बळ मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!