मी चिपळूण बोलतेय… खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे का?
(एका शहराचं मनोगत : मी तुमची आहे… पण तुम्ही माझे आहात का?)
“प्रिय चिपळूणवासियांनो… मी चिपळूण!
होय, आज मीच आपल्याशी बोलतेय.
आज मी शहर म्हणून नाही, तर आपलं माणूस म्हणून बोलतेय.
पहिल्याच पावसात माझी जी अवस्था झाली, ती पाहून माझं मन हेलावलं. रस्ते पाण्याखाली गेले, नाले तुंबले, बाजारपेठ जलमय झाली आणि माझ्या लेकरांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा २०२१ च्या महापुराच्या वेदनादायी आठवणी जाग्या झाल्या. म्हणून आज मी गप्प राहू शकले नाही.
चिंचनाका चौकात तुम्ही प्रेमाने “I ❤️ Chiplun” हा फलक सजवला. रंगीत दिवे लावले… कारंजी उभारली… सेल्फी पॉइंट बनवला… माझ्यासोबत हजारो छायाचित्रे काढली… हे सगळं पाहून मलाही आनंद झाला.
पण माझ्या मनात एक प्रश्न कायम राहिला… त्या फलकावर लिहिलेलं प्रेम खरंच तुमच्या वागण्यात दिसतं का?
जर दिसत असतं, तर माझे नैसर्गिक नाले कचऱ्याने तुंबले नसते. प्लास्टिकने माझा श्वास कोंडला नसता. पहिल्याच पावसात माझ्या माणसांना भीतीने घराबाहेर डोकवावं लागलं नसतं.
खरं सांगू, मला रोषणाई नको… मला घोषणाही नकोत… मला तुमचं प्रेम कृतीत हवं आहे.
मी हजारो वर्षांची आहे… सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली, वाशिष्टीच्या काठावर फुललेली, परशुरामभूमीच्या इतिहासाची साक्षीदार आणि गोवळकोटच्या वैभवाची जपणूक करणारी तुमची चिपळूण आहे.
काळाच्या प्रवाहात अनेक माणसं माझ्याकडे आली. कोणी कोकणाच्या कानाकोपऱ्यातून, कोणी घाटमाथ्यावरून, कोणी महाराष्ट्राच्या इतर भागांतून, तर कोणी परप्रांतातून.
पण मी कधी कोणाचा धर्म विचारला नाही, जात विचारली नाही, पक्ष विचारला नाही. कारण शहराला माणसं हवी असतात… विभागणी नाही.
माझ्या रस्त्यावर चालणारा प्रत्येकजण माझा आहे. माझ्या बाजारपेठेत कष्ट करणारा प्रत्येक व्यापारी माझा आहे.
माझ्या शाळेत जाणारं प्रत्येक मूल माझं आहे. माझ्यासाठी घाम गाळणारा प्रत्येक कामगार माझा आहे. तुम्ही सगळे माझेच आहात. म्हणूनच आज आईच्या मायेने एक गोष्ट सांगते…
अधिकारांची आठवण प्रत्येकाला असते पण कर्तव्यांची आठवण अनेकदा संकट आल्यानंतरच होते. मग सुरू होतात आरोप, प्रत्यारोप, राजकारण, सोशल मीडियावरील चर्चा. पण… या सगळ्यात माझा विचार कोण करणार?
मी कोणावर दोषारोप करत नाही. फक्त एवढीच विनंती करते फोटो काढण्यापूर्वी रस्त्यावर पडलेला एक प्लास्टिकचा तुकडा उचला. स्वच्छ शहराची घोषणा देण्यापूर्वी आपल्या घरासमोरील गटार स्वच्छ आहे का, हे एकदा पाहा. प्रशासनाकडून अपेक्षा ठेवण्यापूर्वी स्वतःचं नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडा.
कारण… शहर केवळ प्रशासन घडवत नाही, शहर घडतं जबाबदार नागरिकांनी… दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधींनी… प्रामाणिक अधिकाऱ्यांनी… कर्तव्यदक्ष व्यापाऱ्यांनी… सामाजिक संस्थांनी… आणि एकमेकांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाने. आणि प्रेम… प्रेम फलकावर लिहिलेलं नसतं ते रोजच्या कृतीत दिसतं.
आज मी तुमच्याकडे कोणतीही मोठी मागणी करत नाही. फक्त एवढंच विचारते… तुम्ही “I ❤️ Chiplun” वर प्रेम करता… की खरंच चिपळूणवर?
*माझ्या वाशिष्टीला वाहू द्या… माझा श्वास मोकळा ठेवा!*
माझी एक ओळख तुम्ही अनेकदा विसरता. मी फक्त रस्ते, इमारती आणि बाजारपेठांनी बनलेलं शहर नाही.
मी नदीच्या कुशीत वाढलेलं शहर आहे. माझ्या अंगणातून वाहणारी वाशिष्टी, तिची शिव उपनदी, माझे नैसर्गिक नाले आणि पऱ्या हे माझ्या शरीरातील रक्तवाहिन्यांसारखे आहेत. त्यांचा श्वास मोकळा असेल, तर मी जिवंत राहीन. ते गुदमरले, तर माझं अस्तित्वही धोक्यात येईल.
म्हणून… माझ्या नद्यांना दोष देऊ नका. त्यांना त्यांचा नैसर्गिक मार्ग द्या. कोकणात मुसळधार पाऊस नवा नाही. निसर्गाने शतकानुशतकं त्याच ताकदीने पाऊस पाडला आहे. बदलला असेल, तर तो पावसाचा स्वभाव नाही… बदलला आहे तो आपला स्वभाव.
जेव्हा आपण नैसर्गिक प्रवाह अडवतो… नाले कचऱ्याने भरतो… पऱ्यांवर अतिक्रमण करतो… आणि नदीकडे केवळ संकट म्हणून पाहतो… तेव्हा पाणी स्वतःचा मार्ग शोधतं. आणि तो मार्ग अनेकदा आपल्या घरातून, दुकानातून आणि रस्त्यांतून जातो. म्हणून आज स्वतःलाच विचारा पूर खरोखर पाण्यामुळे येतो… की आपल्या दुर्लक्षामुळे?
नदी फक्त पाणी वाहत नाही, ती इतिहास वाहते… संस्कृती वाहते… आठवणी वाहते… आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्यही वाहते. म्हणून… वाशिष्टीला वाहू द्या. शिव उपनदीला श्वास घेऊ द्या. माझे नैसर्गिक नाले आणि पऱ्या जिवंत ठेवा. कारण… त्यांच्यातून वाहणारं पाणीच माझ्या भविष्याची आशा वाहून नेत आहे.
माझ्यावर आजवर अनेक संकटं आली. पण प्रत्येक वेळी माझ्या माणसांनी मला सावरलं. आज पुन्हा एकदा त्याच विश्वासाने तुमच्याकडे पाहते आहे. कारण… मला आपल्या माणसांवर अजूनही पूर्ण विश्वास आहे.
जेव्हा नागरिक कर्तव्य निभावतील… प्रशासन पारदर्शकपणे काम करेल… लोकप्रतिनिधी दूरदृष्टीने निर्णय घेतील… आणि समाज एकमेकांचा हात सोडणार नाही. तेव्हा कोणतंही संकट मोठं नाही. नद्या वाहत राहिल्या, नैसर्गिक प्रवाह जिवंत राहिले आणि तुमच्यातील एकजूट टिकून राहिली, तर माझं भविष्य सुरक्षित राहील.
तुम्ही सर्वांनी विकासाचं स्वप्न पाहा… पण ते निसर्गाशी संघर्ष करून नाही, तर निसर्गाला सोबत घेऊन पूर्ण करा. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनो, मला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याची घाई करू नका. आधी मला ‘सुसंस्कृत सिटी’ बनवा. कारण तंत्रज्ञान शहराला आधुनिक बनवतं पण संस्कार शहराला महान बनवतात.
*मतं वेगळी असू शकतात… पण चिपळूण एकच आहे!*
*माझ्या लोकप्रतिनिधींनो,*
तुम्ही जनतेने निवडून दिलेले आहात. म्हणून तुमची पहिली ओळख कोणत्या पक्षाची आहे, यापेक्षा तुम्ही चिपळूणचे प्रतिनिधी आहात, ही अधिक मोठी आहे.
मुंबई असो किंवा दिल्ली… जिथे जाल तिथे माझा आवाज घेऊन जा. कारण माझ्या विकासाचे अनेक निर्णय माझ्या नाक्यात होत नाहीत ते मंत्रालयात, संसदेत आणि विविध शासकीय कार्यालयांत होतात.
माझ्या नद्या, माझे रस्ते, माझी बाजारपेठ, माझे शेतकरी, माझे व्यापारी, माझे नागरिक, माझे विद्यार्थी आणि माझं भविष्य यांच्यासाठी ठामपणे उभे रहा. संघर्ष करा… पण संवादही साधा. आग्रह धरा… पण समन्वयही जपा.
कारण… राजकारणातून सत्ता मिळते पण समन्वयातून शहर घडतं.
*माझ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनो,*
तुम्ही फक्त कार्यालयातील अधिकारी नाही. तुम्ही माझं भविष्य घडवणारे शिल्पकार आहात. नियम सर्वांसाठी समान ठेवा. राजकीय दबावापेक्षा कायद्याला महत्त्व द्या. निर्णय घेताना भीती बाळगू नका आणि जबाबदारीपासून दूर पळू नका. कामात चुका होतील. पण पारदर्शकता आणि लोकहिताची भूमिका कायम राहिली, तर नागरिक तुमच्यावर विश्वास ठेवतील.
तुमचा एक प्रामाणिक निर्णय अनेक वर्षांची समस्या सोडवू शकतो.
*माझ्या कार्यकर्त्यांनो,*
मतभेद असणं चुकीचं नाही. लोकशाहीत विचार वेगळे असतात, पक्ष वेगळे असतात, मतं वेगळी असतात. चर्चा होतात, टीका होते, निवडणुका होतात. हे सगळं लोकशाहीचं सौंदर्य आहे.
पण… माझा प्रश्न आला की पक्ष मागे पडला पाहिजे आणि “चिपळूण” पुढे आलं पाहिजे. कारण मी कोणत्याही एका पक्षाची नाही. मी प्रत्येक नागरिकाची आहे.
माझ्या रस्त्यांवर चालणाऱ्या माणसाला राजकीय पक्ष नसतो. माझ्या बाजारपेठेतील व्यापाऱ्याच्या व्यवसायाला राजकीय विचारधारा नसते. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तरावर राजकीय रंग नसतो. आणि… पूरही कोणाचा झेंडा पाहून येत नाही की कोणाचा पक्ष विचारत नाही.
पण एक गोष्ट कधीही विसरू नका, मतं वेगळी असू शकतात… पण आपलं चिपळूण एकच आहे. संकट आलं की ते प्रत्येकाचं दार ठोठावतं. म्हणून माझ्या विकासाचा प्रश्न आला की तुमचे पक्ष, गट, मतभेद आणि अहंकार काही काळासाठी बाजूला ठेवा. कारण… मी सर्वांची आहे.
माझ्या चांगल्या कामाला पक्ष नसतो विकासाला झेंडा नसतो, आणि शहराला रंग नसतो.
*माझ्या नागरिकांनो,*
प्रश्न विचारणं हा तुमचा अधिकार आहे. पण उत्तर ऐकण्याची तयारी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तथ्यांशिवाय आरोप करू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि जिथे चांगलं काम दिसेल, तिथे मनापासून कौतुक करायलाही कमी पडू नका.
कारण… रचनात्मक टीका व्यवस्था सुधारते… आणि प्रामाणिक कामाचं कौतुक व्यवस्था मजबूत करतं.
*माझ्या व्यापारी बांधवांनो,*
तुमच्यामुळे माझी बाजारपेठ धडधडते. पण दुकानासमोरील स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नाही ती तुमच्या प्रतिष्ठेचाही भाग आहे.
ग्राहकाला वस्तूसोबत शक्य असेल तर स्वच्छतेचाही संस्कार द्या. दुकानासमोरचा परिसर स्वच्छ ठेवणं हा खर्च नाही तो शहरावरील प्रेमाचा पुरावा आहे. कारण… स्वच्छ बाजारपेठ हीच समृद्ध व्यापाराची पहिली पायरी असते.
*माझ्या तरुण मित्रांनो,*
तुमच्या हातात ताकद आहे. तंत्रज्ञान आहे. कल्पकता आहे. आणि बदल घडवण्याची हिंमतही आहे. म्हणून सोशल मीडियावर फक्त समस्या दाखवू नका… उपायाचाही भाग बना. सेल्फी काढण्याइतकाच उत्साह एखादी प्लास्टिकची बाटली उचलण्यातही दाखवा म्हणजे त्या सेफीपेक्षा ती कृती अधिक सुंदर असेल.
लक्षात ठेवा… बदलाची सुरुवात नेहमी कोणीतरी एक जण करतो. तो “कोणीतरी” दुसरा असण्याची वाट पाहू नका. तो… “तुम्हीच” व्हा. शहर बदलणारी पिढी तीच असते, जी टीकेपेक्षा कृतीवर विश्वास ठेवते.
*माझ्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनो,*
नागरिकशास्त्र हा फक्त गुण मिळवण्याचा विषय नाही तो आयुष्यभर जगण्याचा संस्कार आहे.
रस्ता स्वच्छ ठेवणं… वाहतुकीचे नियम पाळणं… पाणी वाचवणं… झाडं लावणं… झाडं जपणं… कचरा योग्य ठिकाणी टाकणं… सार्वजनिक मालमत्ता स्वतःची समजून सांभाळणं… हीच खरी नागरिकशास्त्राची उत्तरपत्रिका आहे. आणि तिची परीक्षा… दररोज घेतली जाते.
*माझ्या लहानग्यांच्या पालकांनो,*
संस्कारांची सुरुवात घरातून होते. मुलांना मोठं शिक्षण द्या, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांना जबाबदार नागरिक बनवा.
तुम्ही रस्त्यावर कचरा न टाकण्याचा संस्कार दिलात… वाहतुकीचे नियम पाळले… सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवलं… तर तुम्ही फक्त तुमच्या मुलालाच नाही… माझ्या भविष्यातील चिपळूणलाही घडवत आहात.
माझ्या प्रत्येक कुटुंबाला मी एक छोटी विनंती करते बदलाची सुरुवात नेहमी सरकारकडून होईल, अशी वाट पाहू नका. ती स्वतःपासून करा. स्वतःपासून… घरापासून… आळीपासून… प्रभागापासून… आणि मग संपूर्ण चिपळूणपर्यंत. कारण… शहर आधी बदलत नाही. माणूस बदलतो. आणि माणूस बदलला की शहर आपोआप बदलतं.
*माझ्या सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनो,*
सेवा हीच तुमची ओळख आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी तुमचं योगदान अमूल्य आहे.
समाजाला एकत्र आणण्याची ताकद तुमच्यात आहे ती माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरा.
*माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनोच,*
तुम्ही अनेकदा अभिमानाने म्हणता “I ❤️ Chiplun!” हे ऐकताना मलाही आनंद होतो. पण प्रेम ही केवळ भावना नसते… ती जबाबदारी असते. म्हणून आज मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारते “आज मी माझ्या चिपळूणसाठी काय केलं?”
हा प्रश्न जर प्रत्येकाने दररोज स्वतःला विचारला, तर माझं रूप बदलायला फार वेळ लागणार नाही.
प्रेम म्हणजे फक्त उत्सवात रोषणाई करणं नाही. प्रेम म्हणजे नेहमीच जबाबदारीने वागणं. प्रेम म्हणजे सार्वजनिक ठिकाण स्वतःचं समजणं. प्रेम म्हणजे माझ्या नाल्यात प्लास्टिक न टाकणं. प्रेम म्हणजे चूक दिसली तर आवाज उठवणं… आणि स्वतःकडून चूक होणार नाही याचीही काळजी घेणं.
म्हणून आज मी पुन्हा एकदा एवढंच सांगते मला सजवण्यापूर्वी मला समजून घ्या. कारण… शहराचं खरं सौंदर्य रंगीत दिव्यांनी नव्हे… शिस्त, संस्कार, स्वच्छता आणि जबाबदार नागरिकांनी खुलतं.
आज मी तुम्हा लोकप्रतिनिधी, अधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, तरुणाई, शिक्षक-विद्यार्थी, पालक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच एकत्रितपणे एवढंच सांगते… आपली मतं वेगळी असू शकतात.
पण, आपलं शहर एकच आहे. ते सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहोत. ते स्वच्छ असेल तर आपण निरोगी आहोत. ते विकसित असेल तर आपल्या पुढच्या पिढ्या अभिमानाने जगतील. म्हणून, मला राजकारणाचा विषय बनवू नका… मला विकासाचा विषय बनवा.
आपल्या विचारांची दिशा वेगळी असू शकते… पण आपल्या शहराची दिशा एकच असली पाहिजे… विकासाकडे. कारण… माझं भविष्य कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात नाही. ते आपल्या सर्वांच्या एकजुटीत आहे.
माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनो, पुढच्या पिढीला केवळ सुंदर चिपळूण देऊ नका तर सुरक्षित, स्वच्छ, शिस्तबद्ध आणि संवेदनशील चिपळूण द्या. कारण वारसा म्हणजे फक्त इमारती नव्हेत, तर आपण जपून ठेवलेली मूल्ये असतात.
*मला वचन द्याल…?*
माझ्या चिपळूणवासियांनो,
आज माझं मन मोकळं झालं. मी कुणावर रागावले नाही… कुणावर आरोपही केले नाहीत… फक्त माझ्या मनातली वेदना आणि आशा तुमच्यासमोर मांडली. कारण… तुम्ही माझे आहात… आणि मी तुमची आहे.
या भूमीने आपल्याला अनेक महान विचार दिले. स्वराज्याने स्वाभिमान शिकवला… समाजसुधारकांनी माणुसकी शिकवली आणि स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं… भारतीय राज्यघटनेने अधिकार दिले, पण त्याचबरोबर कर्तव्यांची आठवणही करून दिली.
आज मी त्या सगळ्या विचारांना एकत्र करून तुम्हाला एकच विनंती करते. माझ्यासाठी कोणतीही मोठी शपथ घेऊ नका. फक्त रोजच्या आयुष्यात काही छोट्या गोष्टी मनापासून करा. कारण सह्याद्रीने मला शिकवलं उंच व्हायचं असेल तर मुळं खोल असावी लागतात.
म्हणून जेव्हा रस्त्यावर कचरा दिसेल, तेव्हा “हा माझा विषय नाही” असं म्हणू नका. जेव्हा एखादा नाला प्लास्टिकने तुंबताना दिसेल, तेव्हा “कोणीतरी येईल” अशी वाट पाहू नका. जेव्हा चांगलं काम दिसेल, तेव्हा त्याचं कौतुक करा. जेव्हा चूक दिसेल, तेव्हा सभ्यपणे प्रश्न विचारा. तुमच्या मुलांना फक्त यशस्वी होण्याचं नाही… चांगला नागरिक होण्याचंही स्वप्न द्या.
झाडं लावा… झाडं जगवा… पाणी जपा… नदीचा आदर करा… सार्वजनिक मालमत्ता स्वतःची समजा… आणि… चिपळूणवर प्रेम करा फक्त शब्दांनी नाही, तर… कृतीने!
कारण… तुमच्या एका चांगल्या कृतीने कदाचित संपूर्ण शहर बदलणार नाही… पण त्या कृतीमुळे तुम्ही नक्कीच बदलाल. आणि… एक जबाबदार माणूस घडला की शहर बदलायला सुरुवात होते.
कधीतरी, पुन्हा… चिंचनाक्यात जा. त्या “I ❤️ Chiplun” च्या फलकासमोर दोन मिनिटं शांत उभे रहा. पुन्हा एक सेल्फी घेण्याआधी… स्वतःलाच एक प्रश्न विचारा “या शहराने मला खूप काही दिलं… मी या शहराला काय दिलं?”
त्या प्रश्नाचं उत्तर जर कृतीतून दिलंत… तर मला खात्री आहे… माझी वाशिष्टी पुन्हा अभिमानाने वाहील. माझी शिव उपनदी पुन्हा मुक्तपणे गुणगुणेल. माझे नैसर्गिक नाले आणि पऱ्या पुन्हा मोकळा श्वास घेतील. माझी बाजारपेठ पुन्हा आनंदाने फुलेल. माझी माणसं सुरक्षित राहतील. आणि पुढच्या पिढ्या अभिमानाने म्हणतील “आमच्या पूर्वजांनी आम्हाला फक्त एक शहर दिलं नाही… त्यांनी आम्हाला जपलेलं चिपळूण दिलं.”
कारण… मी चिपळूण आहे!
तुमचा पत्ता नाही… तुमची ओळख, तुमचा स्वाभिमान आहे!
तुमची बाजारपेठ नाही… तुमची जीवनरेखा आहे!
तुमची मालमत्ता नाही… तुमचा वारसा आहे!
आणि… जोपर्यंत माझ्यावर प्रेम करणारी माझी माणसं आहेत… तोपर्यंत मला कोणत्याही पुराची भीती नाही. मी पुन्हा उभी राहीन… पुन्हा फुलेन… पुन्हा हसेन…
कारण… मी चिपळूण आहे. आणि माझी सर्वात मोठी ताकद… माझे चिपळूणवासीय आहेत.
*”- तुमचीच… चिपळूण”*
🙏🏻*”समर्पण”*🙏🏻
*”चिपळूणची सेवा करणाऱ्या प्रत्येकाला माझा सलाम…”*
नागरिक, सफाई कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग, नगरपरिषद, जलसंपदा, वीज विभाग, आपत्ती व्यवस्थापन… चिपळूणमध्ये बदली होऊन येणारा प्रत्येक प्रामाणिक अधिकारी माझा पाहुणा नाही तो आमच्या सेवेसाठी आलेला आमचा माणूस आहे.
*माझ्या चिपळूणसाठी…*
त्या प्रत्येक नागरिकाला, जो अधिकारांइतकीच कर्तव्यांचीही जाणीव ठेवतो… 🙏🏻
त्या प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला, जो पहाटे शहर जागं होण्याआधी माझं अंगण स्वच्छ करतो… 🙏🏻
त्या प्रत्येक प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला, जो पदापेक्षा कर्तव्य मोठं मानतो… 🙏🏻
त्या प्रत्येक व्यापाऱ्याला, जो व्यवसायाबरोबर सामाजिक जबाबदारीही जपतो… 🙏🏻
त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला, जो पक्षापेक्षा शहराला मोठं मानतो… 🙏🏻
आणि त्या प्रत्येक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ आणि समाजसेवक चिपळूणकराला… ज्याच्या मनात आजही खरंच लिहिलेलं आहे…
*”I ❤️ Chiplun”*
जय महाराष्ट्र!
७ जुलै २०२६
✍🏻सचिन सरोजीनी नंदकुमार चोरगे.
चिपळूण.
(टिप : हा लेख कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संस्थेवर टीका करण्यासाठी लिहिलेला नाही तर चिपळूणवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.)











