WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वाशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब!


वाशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब

🔴एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

🔴नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरपालिका टीमचे धाडसी बचावकार्य

चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पाण्याने बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा चिपळूणकरांच्या मनात भीतीचे सावट निर्माण केले. कोळकेवाडी धरणातून जनरेशनसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आणि त्याचा फटका एनरॉन पुल परिसरातील एका कुटुंबाला बसला. घराभोवती क्षणाक्षणाला वाढणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण कुटुंब अक्षरशः संकटाच्या विळख्यात सापडले होते.

पावसाचे प्रमाण कमी, बाहेर अंधार आणि त्यातच पाण्याची पातळी अचानक वाढत असल्याने कुटुंबातील सदस्य कमालीचे घाबरले होते. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने मदतीची प्रतीक्षा हाच त्यांच्यासमोर एकमेव पर्याय उरला होता. परिसरातील नागरिकांनी ही बाब लक्षात येताच नगरसेवक प्रमोद बुरटे यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी तातडीने दखल घेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी समन्वय साधला. नगरपालिकेची टीम सोबत घेऊन ते प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा वेग आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करत बचावकार्याला सुरुवात झाली.

दोरी, सुरक्षासाहित्य आणि स्थानिकांच्या मदतीच्या जोरावर आपत्ती व्यवस्थापन पथकाने नियोजनबद्ध आणि धाडसी रेस्क्यू करत अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना एकामागोमाग एक सुरक्षितस्थळी हलवले. काही काळासाठी भीतीच्या छायेत असलेल्या त्या कुटुंबासाठी हा क्षण नवजीवन देणारा ठरला. उपस्थित नागरिकांनी सुटकेनंतर टाळ्यांच्या गजरात नगराध्यक्ष उमेश सकपाळ व पथकाचे स्वागत करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

या बचाव मोहिमेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढाम्बकर, नगरसेवक प्रमोद बुरटे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, माजी नगरसेवक रतन पवार, सुयोग चव्हाण, दयानंद जुवळे, निलेश किंजळकर, अजय कासारे, गोट्या मोहिते, इकबाल इरफान, सिद्धेश रेडीज, निखिल शेट्टी तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या समन्वय, तत्परता आणि धाडसी प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

या घटनेने नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा असतो, याची पुन्हा एकदा प्रचिती दिली. दरम्यान, पावसाचा वाढता जोर आणि नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक नसल्यास नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!