‘रोटरी’च्या हेरंब लोंढे याने केली संभाव्य लघुग्रहाची नोंद
अवकाश संशोधनात झेप, अभिनंदनाचा वर्षाव
दापोली : रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड येथे इयत्ता सातवीतील विद्यार्थी हेरंब मुकुंद लोंढे याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील Asteroid Search Campaign मध्ये सहभागी होत अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अवकाशातील दुर्बिणीतून प्राप्त झालेल्या प्रतिमांचा अभ्यास करताना हेरंबने हालचाल करणाऱ्या एका संभाव्य लघुग्रहाची (Asteroid Candidate) नोंद केली आहे.
हेरंबने केलेले हे निरीक्षण “L. Heramb – P12kFHS” या निरीक्षण कोडसह Preliminary Asteroid Detection म्हणून नोंदवण्यात आले आहे. या निरीक्षणाची पुढील वैज्ञानिक पडताळणी Minor Planet Center मार्फत सुरू असून ही संस्था International Astronomical Union अंतर्गत कार्यरत आहे. जगभरातील लघुग्रह शोधांची अधिकृत नोंद ठेवण्याचे काम ही संस्था करते.
हेरंब सध्या रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी असून आई डॉ. रेणू मुकुंद लोंढे या देखील पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. कुटुंबाकडून मिळणारे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठबळ हेरंबला लाभत आहे.
या यशामध्ये EsroMagica या संस्थेचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले आहे. हेरंबच्या या यशामुळे दापोली परिसरातील पशुपालक शेतकरी तसेच खगोलप्रेमींमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेरंबच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोकणातील विद्यार्थ्यांची विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रातील क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.












