चिपळूण शहर जिजाऊ ब्रिगेडतर्फे ओझरवाडी येथे हळदीकुंकू समारंभ
चिपळूण : चिपळूण शहर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जि.प. ओझरवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या पालक महिला भगिनींसोबत हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व जिजाऊ पूजन तसेच जिजाऊ वंदनेने करण्यात आली.
या समारंभामागील प्रमुख उद्देश म्हणजे प्रत्येक महिला भगिनींना हळदीकुंकूचा सन्मानाचा मान मिळाला पाहिजे, ही जनजागृती समाजात रुजविणे हा होता. “गंगा भागीरथी आणि सुवासिनी दोघींचाही आहे मान… नका करू दुजा भाव, सर्वजणींनी एकत्र येऊन वाटा सौभाग्याचे वाण,” असा सामाजिक समतेचा संदेश यावेळी देण्यात आला. हळदीकुंकू हा सर्व भगिनींचा अधिकार असून कोणत्याही माऊलीचा अपमान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता राणे, सुनंदा खंडजोडे, सुप्रिया साळुंखे, समीक्षा करंजकर, सानवी धाडवे, ममता शिंदे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा स्नेहलताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई चाळके, जिल्हा सचिव पूर्वा तांदळे, अनामिकाताई हरदारे, मनोरमा पाटील, सुगंधाताई चिवटे, शहर अध्यक्षा वर्षा खटके पाटील, उपशहर अध्यक्षा अपूर्वाताई गायकवाड आदी मान्यवर जिजाऊंच्या लेकी उपस्थित होत्या.
जि.प. ओझरवाडी शाळेत कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल मुख्याध्यापिका सुनिता राणे यांचे आभार मानण्यात आले. तसेच सर्व शिक्षिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व पालक महिला भगिनींचे जिजाऊ ब्रिगेडतर्फे आभार मानण्यात आले.
हा हळदीकुंकू समारंभ चिपळूण शहर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती सौ. वर्षा खटके पाटील (शहर अध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, चिपळूण) यांनी दिली.











