WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वाद पेटला; नगराध्यक्ष विरुद्ध विभाग प्रमुख प्रकरणावर शिवसेना आक्रमक


वाद पेटला; नगराध्यक्ष विरुद्ध विभाग प्रमुख प्रकरणावर शिवसेना आक्रमक

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि मालमत्ता विभाग प्रमुख सागर शेडगे यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला असून या प्रकरणावरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप सागर शेडगे यांनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी संजय जाधव यांना जाब विचारला. तसेच संबंधित विभाग प्रमुखावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

नगर पालिकेत झालेल्या या बैठकीत शिवसैनिकांनी आपली भूमिका ठामपणे मांडत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, पालिकेतील गटनेते अंकुश आवले, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, माजी नगरसेवक परिमल भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आक्रमक भूमिका घेत सागर शेडगे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

शिवसैनिकांनी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणामुळे नगर पालिकेतील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट करत, “नगर पालिकेचे काम कायद्याच्या चौकटीत आणि नियमांनुसार व्हावे, यासाठी सूचना देण्यात आल्या. कायद्याच्या चौकटीत काम करण्यास सांगणे चुकीचे नाही,” असे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी भूमिका समोर आल्या आहेत.

नगर पालिकेतील बैठकीनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेतली. यावेळीही शिवसैनिकांनी आपली भूमिका मांडत प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली. या संपूर्ण घडामोडीत पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे हे विशेष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

या प्रकरणामुळे चिपळूण नगर पालिकेतील वातावरण चांगलेच तापले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!