वीस हजार झाडांच्या रूपाने कै. अजितदादांना वाहणार अनोखी श्रद्धांजली
🔷फळझाडे आणि ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची ग्रामीण भागात लागवड
🔷पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांची घोषणा
चिपळूण : “एखाद्या व्यक्तीची आठवण केवळ शब्दांत नव्हे, तर समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या कार्यातून जपली गेली पाहिजे. कै. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात वीस हजार वृक्षांची लागवड आणि रोपवाटप करण्यात येणार आहे,” अशी माहिती चिपळूण तालुका पर्यावरण वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष तथा पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत दहा हजार फळझाडे आणि दहा हजार ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची रोपे ग्रामीण भागातील नागरिकांना वितरित करण्यात येणार असून त्यांची व्यापक प्रमाणावर लागवडही केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मुकादम यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, चिपळूण तालुका पर्यावरण वृक्ष संवर्धन समिती, पंचायत समितीचा कृषी विभाग, वनविभाग, रोपवन अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तालुक्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायती सक्रिय सहभाग घेणार आहेत. विविध गावांमध्ये रोपवाटप, वृक्षलागवड आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शौकतभाई मुकादम म्हणाले, “कै. अजितदादांच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पर्यावरणाचे रक्षण. प्रत्येक लावलेले झाड ही त्यांना वाहिलेली जिवंत श्रद्धांजली असेल. ही झाडे पुढील अनेक वर्षे फळे, सावली आणि शुद्ध प्राणवायू देत समाजाची सेवा करतील.”
याशिवाय तालुक्यातील २५ शाळा व महाविद्यालयांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन आणि जैवविविधतेविषयी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, केवळ वृक्षलागवडीपुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता लागवड केलेली रोपे जगविण्यावरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार असून वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कै. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ राबविण्यात येणारा हा हरित उपक्रम पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतानाच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.













