डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दारू विक्री बंद ठेवा
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी दारू विक्री पूर्णतः बंद ठेवण्याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. चिपळूण शहरात भीमसैनिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होत असतात.
या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी १४ एप्रिल रोजी चिपळूण शहरातील सर्व दारू/मद्य विक्री केंद्र बंद ठेवावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, संबंधित यंत्रणांनी विशेष खबरदारी घेऊन हा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.










