काविळतळीतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अपघाताचा धोका वाढला, गतिरोधकाची मागणी
चिपळूण : शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील काविळतळी-कराड रोड परिसरात वाढती वाहतूक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी वर्दळ लक्षात घेता त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन नगर पालिकेतील बांधकाम सभापती कपिल शिर्के यांना देण्यात आले.
काविळतळी परिसरातील बांदल स्कूल, इंडियन जिम तसेच भोजने क्रेन समोरील रस्त्यावर दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. विशेषतः शाळेत जाणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांची वर्दळ अधिक असल्याने भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित राहावा आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी योग्य ठिकाणी तातडीने गतीरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले यांनी निवेदनाद्वारे केली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बालकल्याण उपसभापती तथा नगरसेविका राणी महाडिक, नगरसेवक गणेश आग्रे तसेच श्री. मालकर उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनीही परिसरातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.











