डीबीजे महाविद्यालयात २०पासून राष्ट्रीय परिषद
नवीन शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने संशोधन कौशल्य विकासावर भर
चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. महाविद्यालयात दि. २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. “नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषेचा वापर करून प्रादेशिक भाषा, मानव्यशास्त्र आणि मूलभूत विज्ञानात संशोधन कौशल्य विकसित करणे” या महत्त्वपूर्ण विषयावर ही परिषद होणार आहे.
ही राष्ट्रीय परिषद भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत संशोधन पद्धतींवर सखोल चर्चा करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
परिषदेचा मुख्य उद्देश सर्व विषयांमध्ये वैज्ञानिक व तांत्रिक शब्दावलींचा प्रभावी वापर करून संशोधनाला चालना देणे, प्रादेशिक भाषांचा संशोधन प्रक्रियेत समावेश कसा करता येईल यावर विचारमंथन करणे, तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनात स्पष्टता, सुलभता व समावेशकता निर्माण करणे हा आहे. यासाठी देशातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
या परिषदेत डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. प्रताप नाईकवडे, डॉ. नारायण भोसले, प्राचार्य डॉ. वसंत माळी, डॉ. राजशेखर हिप्परगी, डॉ. व्ही. डी. वासमकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. पुरुषोत्तम कुंदे आदी मान्यवर आपले अभ्यासपूर्ण सादरीकरण करून सहभागी संशोधकांना मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता डी. बी. जे. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. उद्घाटनप्रसंगी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, रजिस्ट्रार श्री. विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ही परिषद शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, संशोधनातील नव्या दृष्टिकोनांची देवाणघेवाण होण्याची संधी यातून मिळणार आहे. तरी शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी, संशोधकांनी व विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिषदेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे समन्वयक डॉ. सुधीर मोरे व प्रा. राजरत्न दवणे यांनी केले आहे.











