नागरिकांची गैरसोय टळली!
पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम
टँकरद्वारे पाणीपुरवठा ; उद्यापासून बहुतांश भागात पुरवठा सुरळीत होणार
चिपळूण : गुहागर बायपास येथे सुरू असलेल्या महामार्ग कामादरम्यान पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या घटनेमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाणीपुरवठा व जल नि:सारण विभागामार्फत तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, संबंधित टाकीचे काम पूर्ण झाले असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुरादपूर परिसरात पाईपलाइन शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे या भागात उद्याही टँकरनेच पाणीपुरवठा केला जाणार आहे.
उक्ताड परिसरात सध्या कमी दाबाने अर्धा-अर्धा तास पाणीपुरवठा सुरू असून उद्या सकाळी ७ वाजल्यापासून येथे पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खेंड बावशेवाडी परिसरात दिवसभर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून आज रात्री ११ वाजल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरू होईल. तसेच गोवळकोट भोईवाडी आणि तारा बौद्धवाडी येथे सध्या टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरित गोवळकोट भागातही आज रात्री ११ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व जल नि:सारण समितीचे सभापती निहार कोवळे यांनी दिली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.











