WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

नगर पालिका इमारतीचा वापर तात्काळ बंद करा!


नगर पालिका इमारतीचा वापर तात्काळ बंद करा!

इनायत मुकादम यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

चिपळूण : चिपळूण नगर पालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असूनही तिचा वापर सुरूच ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
१९४२ साली बांधण्यात आलेल्या या इमारतीला सुमारे ८२ वर्षांहून अधिक कालावधी झाला असून तांत्रिकदृष्ट्या या इमारतीचे आयुर्मान संपुष्टात आलेले आहे. अर्जानुसार, इमारतीच्या छताचा प्लास्टर वारंवार कोसळत असून यापूर्वीही स्लॅबचे तुकडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात गळती लागणे, छताचे थर उखडणे यामुळे ही इमारत दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालली आहे.
माजी नगरसेवक मुकादम यांनी नमूद केले आहे की, ४ मे २०२२ रोजी त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार करून प्रत्यक्ष भेटही घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, तब्बल तीन वर्षे उलटूनही नगर परिषदेकडून ना ऑडिट करण्यात आले, ना कोणतीही दुरुस्ती किंवा मजबुतीकरणाची उपाययोजना करण्यात आली, असा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर नवीन लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यभार सुरू झाला असून, या इमारतीत रोज शेकडो नागरिक, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत आहेत. अशा परिस्थितीत भूकंप, वादळी वारे किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास मोठ्या प्रमाणात प्राण व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही अर्जात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन तात्काळ आदेश द्यावेत, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या अपघातास जबाबदार कोण? असा थेट सवालही मुकादम यांनी उपस्थित केला आहे. दिरंगाईमुळे जर दुर्घटना घडली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच असेल, असा इशाराही त्यांनी आपल्या अर्जात दिला आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!