मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज तोफ धडाडणार!
⭐ महायुतीच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा
⭐ चिपळूणचे राजकीय मैदान तापणार
⭐ ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा : प्रशांत यादव
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीकडून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, आज बुधवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चिपळूण नगरी सज्ज झाली असून रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर अख्ख्या कोकणचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

महायुती उमेदवारांसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. यामुळे ही सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असून आज चिपळूणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

या जाहीर सभेला भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व खासदार ना. नारायण राणे, पालकमंत्री ना. उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यामुळे महायुतीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

या सभेची माहिती देताना भाजप नेते प्रशांत यादव म्हणाले,
“ही सभा चिपळूणच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या भव्य सभेचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. महायुतीच्या विकासाच्या विचारांना बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.”
आजच्या या सभेमुळे चिपळूणमध्ये निवडणूक प्रचाराला नवे बळ मिळणार असून, महायुतीचा शक्तिप्रदर्शनाचा हा मोठा टप्पा ठरणार आहे.











