चिपळूणमध्ये उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’
चिपळूण : नागरिकांच्या महसूल विषयक समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, चिपळूण नगर परिषद तसेच विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार , दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत इंडिया गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश लोकाभिमुख प्रशासन राबवून नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक अडचणी एकाच ठिकाणी सोडवणे हा आहे. ‘सिंगल विंडो’ प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृती, पडताळणी आणि तत्काळ कागदपत्र वितरण करण्यात येणार असून तक्रार निवारणालाही प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून ७/१२, ८अ उतारे आणि ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ प्रणाली अधिक गतिमान करण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये महसूल दस्तऐवज, फेरफार नोंदी, डिजिटल ७/१२ व ८अ उतारे, लोकसेवा हक्क अंतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रे, ई-मोजणी, आरोग्य शिबिर, आयुष्मान भारत कार्ड, पी.एम. किसान योजना आदी सेवांचा समावेश आहे. तसेच जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, मालमत्ता कर उतारे, मोबाईल सेवा, व्यापारी परवाने, तलाठी व कार्यालयीन कामांशी संबंधित तक्रारींचे निवारण, प्रधानमंत्री आवास योजना, व्यवसाय नोंदणी दाखले, आरोग्य नोंदणी दाखले, बांधकाम परवाने, झुडपीड परवाने आणि रमाई आवास योजना यांसारख्या विविध योजनांबाबतही मार्गदर्शन व सेवा दिल्या जाणार आहेत.
शासनाच्या विविध अधिसूचना आणि जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत प्रकरणांबाबत जनजागृती करण्यात येणार असून शेतजमिनी, अकृषिक जमीन, तुकडेबंदी, एकत्रीकरण आणि सहहिस्सेदारी विभाजन यांसारख्या विषयांवरही माहिती दिली जाणार आहे.
उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि मुख्याधिकारी संजय जाधव यांनी नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळाच्या शिबिराच्या दिवशी आवश्यक मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.












