देवरुख येथे घरफोडी; सुमारे ४.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
देवरुख (ता. संगमेश्वर) : देवरुख येथील बागवाडी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवार, १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत एक महिला फिर्यादी यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या घरी कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून कपाटातील लॉकरची चावी काढून लॉकरमधील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा दरसार व चैन असा ऐवज चोरून नेला.
या चोरीप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३३१(३) व ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Views: 138












