चिपळुणात बाहेरच्या फिरत्या व्यापाऱ्यांची ‘राजरोस एंट्री’
स्थानिक व्यावसायिक संतप्त
नगराध्यक्षांचे आदेश कागदावरच?
चिपळूण : शहर परिसरात बाहेरून येणाऱ्या फिरत्या व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. चिपळूण लगतच्या खेर्डी सीमेपलीकडून येणाऱ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांना शहरात प्रवेशास बंदी घालण्यात येईल तसेच फिरस्त्या गाडीवाल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यापारी वर्गासोबत झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार नगर पालिका प्रशासनालाही त्यांनी तातडीच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र प्रत्यक्षात मात्र या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप आता स्थानिक व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. शहरातील विविध भागांत बाहेरचे फेरीवाले व फिरस्ते व्यापारी खुलेआम व्यवसाय करत असल्याचे चित्र आजही कायम असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“नगराध्यक्षांनी आदेश दिले तरी प्रशासन आपलीच मनमानी करणार का?”, “दरवेळेसारखेच हे प्रकरण दुर्लक्षित ठेवून चिपळूण कधी सुधारणार?”, असे थेट सवाल संतप्त व्यापाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. नगर पालिकेच्या हाकेच्या अंतरावर रस्त्यांवर उभे असलेले अनधिकृत बाहेरील फेरीवाले प्रशासनाला दिसत नाहीत का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
नगर पालिका अधिनियम व कायद्यानुसार एकदाही ठोस कारवाई झालेली नाही, पुढे होईल की नाही याची शाश्वती नाही, अशी भावना व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. “आधीच्यांनी काही केलं नाही म्हणून आम्हीही करणार नाही” अशी भूमिका प्रशासनाने घेऊ नये, अशी तीव्र अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
आमचा व्यवसाय आमच्या दुकानात व्हावा, नियमबाह्य आणि बाहेरच्या स्पर्धेमुळे आमच्यावर अन्याय होऊ नये, हीच माफक अपेक्षा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नगराध्यक्षांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतरही जर तेच चित्र कायम राहात असेल, तर प्रशासनाला नेमके काय अपेक्षित आहे? असा सवालही उपस्थिती केला जात आहे.












