चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये अपहार
आउटसाईड शाखा डाकपाल महिलेविरोधात गुन्हा दाखल
दाभोळ : चिखलगाव पोस्ट ऑफिस (ता. दापोली) येथे कार्यरत असलेल्या आउटसाईड शाखा डाकपाल महिलेने तीन पोस्ट खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद हरिश्चंद्र जोशी (वय २६, व्यवसाय – नोकरी, डाकघर निरीक्षक, गुहागर) यांनी दाखल केली आहे. ते सध्या गुहागर तालुक्यात कार्यरत असून मूळ रहिवासी उत्तराखंड राज्यातील उधमसिंहनगर जिल्ह्यातील रुद्रपुर येथील आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती सोनिया संदेश तेलप (वय २६, रा. मळे वरची वाडी, दापोली) या दिनांक ९ जुलै २०२० ते १७ ऑगस्ट २०२० या कालावधीत चिखलगाव येथे आउटसाईड शाखा डाकपाल म्हणून नेमणुकीवर असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यांनी निलेश गोविंद घडवते, सौ. लक्ष्मी सखाराम शिगवण, सौ. सरिता गजानन कांबळे या तीन पोस्ट खातेधारकांच्या खात्यातून एकूण ३६,६०० रुपये परस्पर काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी गु.र.नं. ०४/२०२६ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४०९ (विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.१२ वाजता नोंदविण्यात आला आहे.












