WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

अंधश्रद्धा, वन्यजीव संघर्ष आणि मानवी लोभ यांचं थरारक दर्शन!


अंधश्रद्धा, वन्यजीव संघर्ष आणि मानवी लोभ यांचं थरारक दर्शन

भुसावळच्या ‘धुमस’ने प्रेक्षकांना खिळवले

चिपळूण : महानिर्मिती–कोयना जलविद्युत केंद्र आयोजित नाट्यस्पर्धेत भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘धुमस’ या नाटकाने अंधश्रद्धेमुळे निर्माण होणाऱ्या मानव व वन्यजीव संघर्षाची चित्तथरारक कथा प्रभावीपणे मांडली. २० जानेवारी रोजी संध्याकाळच्या सत्रात सादर झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर ही संकल्पनाच मुळात फसवी असून, प्रत्यक्षात मानवानेच वन्यजीवांच्या अधिवासावर अतिक्रमण केले आहे, हा ठळक संदेश नाटकातून प्रभावीपणे पोहोचतो. अंधश्रद्धा, काळी जादू, तंत्र-मंत्र यांच्या आहारी गेलेल्या समाजामुळे वन्यजीवांवर होणाऱ्या अत्याचारांचे आणि त्यातून उद्भवणाऱ्या मानवी शोकांतिकेचे विदारक चित्रण ‘धुमस’मध्ये पाहायला मिळते.

नाटकाचे कथानक वन अधिकारी रुद्रापाल यांच्या गूढ मृत्यूभोवती फिरते. गावच्या सरपंचाने कथित खजिन्याच्या हव्यासापोटी काळी जादू करणाऱ्या मांत्रिकासोबत एका बछड्याचा बळी दिल्याची घटना, तसेच याबाबत कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून रुद्रापालचाही बळी घेतल्याचे सत्य हळूहळू उलगडत जाते. रुद्रापालचा बालमित्र अरुण्येश या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो. या संघर्षात रुद्रापालची प्रेयसी पालवी सरपंचाच्या प्रचंड दबावाला न जुमानता सत्याच्या बाजूने उभी राहते.

भव्य आणि वास्तवदर्शी नेपथ्य, वाघ, वाघिण, अस्वल अशा वन्यप्राण्यांची प्रभावी मांडणी आणि प्रकाशयोजनेमुळे नाटकाला अपेक्षित वातावरणनिर्मिती लाभली. सर्व गावकरी व पोलिसांसमोर आधी वाघाच्या बछड्याचा आणि नंतर रुद्रापालचा बळी दिल्याचे सत्य पुराव्यानिशी उघड होताच, प्रतिकात्मक पद्धतीने रुद्रापालच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि नाटकाचा प्रभावी समारोप होतो.

अंधश्रद्धा माणसाला किती टोकाला नेऊ शकते, याचे भयावह दर्शन घडवणारे ‘धुमस’ हे नाटक उत्कृष्ट अभिनय, गूढ कथानक आणि तांत्रिक बाजूंच्या भक्कम मांडणीमुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

नाटकाचे तपशील :
लेखक : श्री. अतुल एन. साळवे
दिग्दर्शक : श्री. राजेश पवार
नेपथ्य : श्री. रोशन वाघ
प्रकाशयोजना : श्री. अतुल बऱ्हाटे
संगीत : श्री. मोहित कांबळे
रंगभूषा व केशभूषा : श्रीमती ज्योती चंद्रमोरे

कलाकार :
प्रविण मोरे, ऐश्वर्या खोसे, महेश होनमाणे, शुभम गुडा, स्वप्निल जाधव, अश्विन शेखरवार, दिक्षल खैरनार, पुजा गुलांबे, करूणा लाड, संदीप पाटील, नवनाथ रेणके, आकाश वाघ, सुनील घोरपडे, यश हरगोडे, परेश पचलोड, केतन कांबळे, गीतांजली घोडे, श्रावणी गुडा, अतुल बऱ्हाटे, रोशन भगत, मोहित कांबळे, अनिल घोडे, रोशन वाघ, ज्योती चंद्रमोरे, नितीन सोनवणे, दीपक ढाके, संतोष शेळके, एम. पी. चरखे, शाम लाड.


नाट्यस्पर्धेच्या पुढील सादरीकरणांमध्ये गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कोरडी औष्णिक विद्युत केंद्राचे ‘द रेन इन द डार्क’ आणि संध्याकाळी ५:३० वाजता उरण वायू केंद्राचे ‘रंगसावल्या’ हे नाटक सादर होणार असून, सर्व नाटकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!