घंटा चोर निघाला अट्टल गुन्हेगार
तब्बल 16 चोऱ्यांचा उलगडा
खेड : तालुक्यातील शिरगाव खुर्द येथील शिवाजीनगर परिसरातील काळकाई देवी मंदिरात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात खेड पोलिसांना अखेर यश आले आहे. दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान अज्ञात इसमाने मंदिरातील पितळी घंटा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर आदी साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढला
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित इसम रत्नागिरी व रायगड परिसरात वारंवार वावरत असल्याचे निष्पन्न केले. तपासाची सूत्रे लोणावळा–खोपोली परिसराकडे वळताच पथकाने सापळा रचला आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
राकेश तुळशीराम पडवकर (वय 37, रा. कुसगाव, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे)
जगलाल रामनरेश केवट (वय 50, रा. शांतीनगर वसाहत, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड)
सहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत
आरोपींकडून विविध कंपन्यांचे HIKVISION डीव्हीआर, हार्डडिस्क, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे मंदिरातील विविध वजनांच्या पितळी घंटा, समई, घंटेचे लोलक, कडा आदी धार्मिक साहित्यही हस्तगत करण्यात आले.
यामध्ये 40 किलो, 25 किलो, 20 किलो, 15 किलो वजनाच्या मोठ्या घंटांसह एकूण 6,55,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय चोरीसाठी वापरण्यात आलेली MH14FG6447 क्रमांकाची मारुती स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली.
16 गुन्ह्यांचा उलगडा
या आरोपींकडून खेड, दाभोळ, दापोली, मंडणगड, बाणकोट, महाड एमआयडीसी, पोलादपूर आदी पोलीस ठाण्यांतील एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. मंदिरातील घंटा व धार्मिक साहित्य चोरी करून ते भंगारात विक्री करण्याचा त्यांचा डाव असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांची कामगिरी
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक अहीरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा दराडे, विजेंद्र सातार्डेकर, वैभव ओहोळ, अजय कडू, शिरीष साळुंके यांच्या पथकाने केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि जलद हालचालीमुळे हा गुन्हा उघडकीस आला असून परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.











