WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

नात्यातील अनुरूपतेवर आधुनिक दृष्टीकोन मांडणारे ‘बदाम सात’


नात्यातील अनुरूपतेवर आधुनिक दृष्टीकोन मांडणारे ‘बदाम सात’

नाशिक औष्णिक विद्युत केंद्राने सादर केले प्रभावी नाटक

चिपळूण : मानवी मन सतत भूतकाळातील आठवणी आणि भविष्यकाळातील अपेक्षा यामध्ये अडकलेले असते. त्यामुळे वर्तमानातील वास्तव स्वीकारणे अनेकदा कठीण जाते. हाच मानसिक संघर्ष नातेसंबंधांवरही परिणाम करत असतो. नात्यातील सुरुवातीचे नावीन्य ओसरल्यानंतर निर्माण होणारी अस्वस्थता, अपेक्षा आणि वास्तव यातील वाढती दरी, तसेच बदलाची अपेक्षा नेहमी समोरच्याकडूनच असणे – या साऱ्या भावनिक गुंतागुंतींवर भाष्य करणारे ‘बदाम सात’ हे नाटक नाशिक औष्णिक विद्युत केंद्राने महानिर्मिती नाट्य स्पर्धेतील २१ जानेवारीच्या सकाळच्या सत्रात प्रभावीपणे सादर केले.

‘बदाम सात’ हे नाटक ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ या आजच्या काळातील संवेदनशील विषयावर आधारित असून, सागर आणि प्राजक्ता या जोडप्याच्या नातेसंबंधांभोवती कथानक फिरते. सुमारे ८-९ महिने एकत्र राहिल्यानंतर नात्यातील नावीन्य कमी होऊ लागते, एकमेकांना गृहीत धरणे, चुका शोधणे आणि अपेक्षांचा वाढता ताण यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थितीत ‘सागर’ला लिव्ह-इनपूर्वीचं ‘इन लव्ह रिलेशनशिप’ पुन्हा अनुभवायचं असतं. यासाठी तो आपल्या मित्रांची – अनिकेत आणि राहुल – मदत घेतो.

या नाटकाचं वेगळेपण म्हणजे मेटाव्हर्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटीचा कल्पक वापर. आयझॅक न्यूटनचे नियम, आर्किमिडीजचे सिद्धांत, लेविस न्यूटनचे तत्त्वज्ञान आणि शकुनी मामाच्या मुत्सद्देगिरीचा वापर करत ‘लिव्ह-इन’ नातं पुन्हा ‘इन लव्ह’मध्ये रूपांतरित करण्याचे प्रयत्न अत्यंत विनोदी आणि रंजक पद्धतीने रंगवण्यात आले आहेत. वैज्ञानिक नियमांचा वापर मानवी नातेसंबंधांमध्येही होऊ शकतो, ही कल्पना प्रेक्षकांसाठी नाविन्यपूर्ण आणि विचारप्रवर्तक ठरते.
कथानक पुढे जात असताना एका टप्प्यावर ‘प्राजक्ता’ला सागरचे हे सर्व प्रयत्न समजतात. ती सागरच्या मित्रांना घरी बोलावून नातेसंबंधांमधील त्याच्या शंका-कुशंकांचे प्रभावी उत्तर देते. नात्यातील तणाव कमी करण्यासाठी केवळ समोरच्याने बदलावे अशी अपेक्षा न ठेवता, स्वतःमध्ये बदल घडवण्याची गरज ती ठामपणे मांडते. याच वास्तववादी भूमिकेवर नाटकाचा समर्पक शेवट होतो.

नाटकातील विनोदाचे टायमिंग अत्यंत अचूक असून नेपथ्य, वेशभूषा, संगीत आणि प्रकाशयोजना यांचा परिणामकारक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण सादरीकरण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ठरले.

नाटकाची तांत्रिक व कलात्मक टीम :
लेखक : श्री. हेमंत बेळे
दिग्दर्शक : श्री. शैलेंद्र पाटील
नेपथ्य : श्री. विजय साळवे, श्री. प्रभाकर रेवगडे
प्रकाशयोजना : श्री. महेश तुपे, श्री. विशाल जाधव
नेपथ्य/प्रकाश योजना सहाय्यक : गौरव पुणेकर, रुपाली सकपाळ
रंगमंच व्यवस्था : प्रविण काळोखे
संगीत : शुभांगी बोरकर, प्रियांका धंदर
रंगभूषा व वेशभूषा : सविता शर्मा

कलाकार :
निलेश राऊत, प्रज्ञा वाघ, संग्राम भालेराव, प्रथमेश गांगल, शैलेंद्र पाटील, छकोल शिंदे, रुपाली सकपाळ, प्रियांका धंदर, सविता शर्मा, शुभांगी बोरकर

एकूणच ‘बदाम सात’ हे नाटक आजच्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करताना मनोरंजनाबरोबरच आत्मपरीक्षणालाही प्रवृत्त करते. आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवी भावभावनांची सांगड घालणारे हे सादरीकरण महानिर्मिती नाट्य स्पर्धेत लक्षवेधी ठरले.

महानिर्मिती आंतर विद्युत नाट्यस्पर्धेची आज सांगता

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सुरू असलेल्या महानिर्मितीच्या आंतर विद्युत नाट्यस्पर्धेची सांगता व पारितोषिक वितरण समारंभ आज संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळी ९ वाजता मुंबई सांघिक कार्यालयाचे ‘बाजीराव’, तर दुपारी ४ वाजता खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हे नाटक सादर होणार आहे. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण दहा नाटके सादर झाली असून विविध सामाजिक, मानसिक, विनोदी व विषयांवर आधारित नाटकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर्जेदार सादरीकरणामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!