राज्यातील काही मंत्रीही अशोक खरात यांचे ‘पट्टशिष्य’ : विनायक राऊत
‘हेवीवेट’ मंत्र्यांवरही कठोर कारवाई करा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर हल्लाबोल
चिपळूण : भोंदूबाबा अशोक खरात यांचे एक-एक विकृत कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणावर शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनीही प्रचंड चीड व्यक्त केली आहे. खरात प्रकरणात ‘हेवीवेट मंत्री’ ही सहभागी असल्याचा संशय व्यक्त करत निम्म्यापेक्षा अधिक मंत्री हे अशोक खरात यांचे ‘पट्टशिष्य’ असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सचिव, नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यांची संपूर्ण पोलखोल होणे अत्यंत गरजेचे आहे. या व्हिडिओंमधील कोणतीही माहिती गायब होऊ नये यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून राऊत यांनी म्हटले की, “आपण ज्या धाडसाने अशोक खरात यांच्यावर कारवाई केली, त्याचे स्वागत आहे. मात्र, त्यांच्या संपर्कात असलेले आणि मंत्रिमंडळात असलेले ‘हेवीवेट’ मंत्री यांच्यावरही तितकीच कठोर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात कोणालाही वाचवले जाऊ नये.”
राऊत यांनी आरोप केला की, सध्याच्या मंत्रिमंडळातील निम्म्यापेक्षा अधिक मंत्री हे अशोक खरात यांचे ‘पट्टशिष्य’ असून त्यांच्या भोंदूगिरीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देत होते. गेल्या काही वर्षांत नाशिक ते मुंबई आणि मुंबई ते कामाख्या देवी असा खरात यांचा प्रवास अनेक राजकीय व्यक्तींच्या सहकार्यानेच झाल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच, काही मंत्र्यांनी कथित तांत्रिक-मांत्रिक पद्धतींचा वापर करून राजकारण व समाजकारण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
“अशा प्रकारच्या भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. शिवसेना पक्षाच्या वतीने अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आधीच करण्यात आली असून, या प्रकरणात राजकारणातील अनेक मोठी नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचेही राऊत यांनी सूचित केले.













