SQAAF बाह्य मूल्यांकनात सावर्डे विद्यालयाला ‘अ+’ श्रेणी
आमदार शेखर निकम यांचेकडून विशेष कौतुक
सावर्डे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत सन २०२५–२०२६ मध्ये पार पडलेल्या बाह्य मूल्यांकनात सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे या विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रतिष्ठेची ‘अ+’ श्रेणी प्राप्त केली आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेचा हा अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील एकूण १,०२,६७५ शाळांनी स्वयंमूल्यमापन पूर्ण केले. स्वयंमूल्यमापनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांपैकी सन २०२५-२६मध्ये १०,७१२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी १०,६४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून केवळ ४२९ शाळांना ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. या मानांकनात सावर्डे विद्यालयानेही स्थान पटकावत सह्याद्रीचा झेंडा अटकेपार रोवला आहे.
सहा क्षेत्रांमध्ये सर्वांगीण यश
हे मूल्यांकन पुढील सहा प्रमुख निकषांवर आधारित होते—
➡️अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन
➡️पायाभूत सुविधा
➡️मानव संसाधन व शालेय नेतृत्व
➡️समावेशक पद्धती व लिंग समभाव
➡️व्यवस्थापन, निरीक्षण व प्रशासन
➡️लाभार्थ्यांचे समाधान
या सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या ध्येयवृत्तीमुळे विद्यालयाला हे यश संपादन करता आले.
अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल आमदार शेखर निकम यांनी प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, ज्येष्ठ संचालक मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, शालेय समितीचे अध्यक्ष व विश्वस्त शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, पालक-शिक्षक संघ व परिसरातील शिक्षणप्रेमींनी विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने स्वयंमूल्यमापन प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रभावी उपक्रम राबविले. शिक्षकवर्गाचे परिश्रम, विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि व्यवस्थापनाची दूरदृष्टी यामुळेच हे यश शक्य झाले.
ग्रामीण शिक्षणाचा आदर्श नमुना
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या यशामुळे सावर्डे परिसरातील शैक्षणिक चळवळीला नवी प्रेरणा मिळाली असून इतर शाळांसाठीही हा आदर्श ठरणार आहे.
‘अ+’ श्रेणी प्राप्त करून सावर्डे विद्यालयाने गुणवत्ता, शिस्त, उपक्रमशीलता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.












