WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

दहावीच्या पहिल्याच पेपरला 25 विद्यार्थ्यांची दांडी!


दहावीच्या पहिल्याच पेपरला 25 विद्यार्थ्यांची दांडी!

चिपळूण तालुक्यातील 15 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच

चिपळूण : बारावीची परीक्षा सुरु असतानाच चिपळूण तालुक्यात दहावीच्या परीक्षेलाही शुक्रवारपासून शांततेत प्रारंभ झाला. एकूण 15 केंद्रांवर सुरु झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जवळपास 25 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. विषेश म्हणजे, कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.

तालुक्यातून यंदा दहावी परीक्षेसाठी एकूण 2 हजार 596 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी मराठी माध्यमातून 2 हजार 429 विद्यार्थी असून पहिल्या मराठी पेपरला 23 विद्यार्थी अनुपस्थित होते. उर्दू माध्यमातून 167 विद्यार्थी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 2 विद्यार्थी गैरहजर राहिले. अशा प्रकारे पहिल्याच दिवशी 25 विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला नाही, तर 2 हजार 571 विद्यार्थी शिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करत परीक्षेला सामोरे गेले.

परीक्षा केंद्रांवर सकाळपासूनच शिस्तबद्ध वातावरण होते. विद्यार्थ्यांची तपासणी, ओळख पडताळणी आणि बैठक व्यवस्था नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आली. परीक्षा केंद्र परिसरात शांतता राखण्यात आली होती. गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व तपास पथके सतर्क होती. मंडळाच्या आदेशानुसार सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात येत असून, कॉपीमुक्त व शांततेत पहिला पेपर पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एका केंद्रावर एका दिव्यांग विद्यार्थ्यासाठी लेखनिकाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था व पेपर सोडविण्यासाठी अतिरिक्त एक तास देण्यात आला.

तालुक्यात अलोरे, असुर्डे-आंबतखोल, भोम, युनायटेड हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, धामणंद, कामथे-टेरव, खेर्डी-सती, रामपूर, सावर्डे, वहाळ, आंबडस, परांजपे, मिरजोळी आणि पेढे-परशुराम या १५ केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वितरणाची काटेकोर व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा केंद्रांच्या पुनर्रचनेनुसार खेड तालुक्यातील धामणंद व आंबडस ही दोन केंद्रे चिपळूण तालुक्याला जोडण्यात आली असून, चिपळूणमधील मार्गताम्हाणे हे केंद्र गुहागर तालुक्याशी संलग्न करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाबरोबर थोडा तणावही जाणवत होता. अनेक परीक्षा केंद्रांबाहेर पालकांनी आपल्या पाल्यांना शुभेच्छा देत उपस्थिती लावली होती. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुढील विषयांचे पेपर नियोजित तारखांना घेण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!