पंतप्रधान मोदींविरोधातील आक्षेपार्ह घोषणांप्रकरणी कारवाई करा!
चिपळूण भाजपचे पोलिसांना निवेदन
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चिपळूण, दि. २४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथितरित्या आक्षेपार्ह व अपमानास्पद घोषणा देऊन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, चिपळूण शहर मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.
निवेदनात अयान मिठागरी याच्यावर सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथितरित्या आक्षेपार्ह घोषणा देऊन सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, संबंधित व्यक्तीने यापूर्वीही अशाच प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती शिष्टमंडळाने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधिताविरुद्ध योग्य त्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
भाजपने निवेदनात स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, पुढील आठ दिवसांत संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई झाली नाही किंवा कठोर शासन करण्यात आले नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
हे निवेदन भाजप शहर मंडळाचे अध्यक्ष शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी नगरसेविका रसिका देवळेकर, उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, सरचिटणीस सारिका भावे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उत्तेकर, नगरसेविका शितल रानडे, जिल्हा सहसरचिटणीस आनंद रानडे, नरेंद्र बेलवलकर, कुणाल आंबेकर, पूनम काजारी, राकेश दाते, सौ. टाकळे, अभिषेक राजापूरकर, पूजा कदम, प्रणय वाडकर, विलास चव्हाण, प्रबोधन पिंपुटकर, नगरसेविका अंजली कदम, विनायक भैरवकर, सभापती शुभम पिसे, जतीन घाटे, आनंद टाकळे, अक्षय ओतारी, अनुजा ओतारी, अमोल तटकरे, रोहन जडे, महेश विंचू, सोहन शिंदे, दिनेश लटके, निखिल किल्लेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन सादर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” तसेच “नरेंद्र मोदी साहेब आगे बढो” अशा घोषणाही दिल्या.











