WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिरेखाणीतून ४५ हजारांची केबल चोरी


चिरेखाणीतून ४५ हजारांची केबल चोरी

एक जण ताब्यात, दोघे फरार

सावर्डे : तालुक्यातील पाते-पिलवली फाटा येथील खांडोत्री परिसरातील चिरेखाणीतून सुमारे ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात एकासह अन्य दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाते-पिलवली फाटा येथील खांडोत्री येथे ही घटना १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी राजेश चंद्रकांत सुर्वे (४३, व्यवसाय- चिरेखाण, रा. निवळी कातळवाडी, चिपळूण) यांच्या खांडोत्री येथील चिरेखाणीतून पॉलिकॅब कंपनीची ६ एम.एन. ३ कोअर तांब्याची, काळ्या रंगाच्या प्लास्टिक आवरणाची जुनी वापरती केबल चोरीस गेली होती. यात १०० मीटरचे तीन तुकडे व ५० मीटरचा एक तुकडा, अशी एकूण ३५० मीटर केबलचा समावेश असून तिची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ६ मे रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना शेजारील चिरेखाणीचे मालक दिनेश काशीराम घडशी यांनी फोन करून त्यांच्या खाणीत एक संशयित इसम शिरल्याची माहिती दिली. मुकादम महेश भिमराव शिदे यांनी त्या इसमास पकडून ठेवले होते. मात्र, त्याच्यासोबत अप्पे रिक्षातून आलेले अन्य दोन इसम रिक्षासह पसार झाले.

फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता पकडण्यात आलेला इसम व त्याचे साथीदार यांनीच पूर्वी चोरीस गेलेली केबल चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला.
या प्रकरणी कल्पेश दिलीप शिर्के (२९, रा.,कालस्ते बुद्रुक, उगवतवाडी, ता. चिपळूण) याच्यासह अन्य दोन अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) अन्वये सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!