घरडा वाचनालयाचे ‘विभा अरविंद ग्रंथालय’ असे नामकरण
वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवड
चिपळूण : शहरातील घरडा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा ट्रेंड सेंटर येथील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गिरीश बांदिवडेकर होते. सभेत वाचनालयाच्या नामांतरासह नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी कोषाध्यक्ष विनायक ओक यांनी मागील वर्षातील कामकाजाचा व आर्थिक आढाव्याचा अहवाल सादर केला. हा अहवाल सभासदांनी एकमताने मंजूर केला. यावेळी वाचनालयासाठी स्वतंत्र व प्रशस्त जागेची आवश्यकता असल्याचे मत उपाध्यक्ष प्रकाश काणे यांनी व्यक्त केले. तसेच घरडा उद्योग समूहाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
वाचनालय नवीन जागेत स्थलांतरित करण्याचा ठरावही सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. शहरातील डॉ. यतिन जाधव यांच्या भरीव आर्थिक सहकार्यामुळे आणि त्यांच्या नवीन जागेत वाचनालय स्थलांतरित करण्याच्या पुढाकारामुळे सभासदांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या योगदानाबद्दल सभेत कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर धनंजय चितळे यांनी वाचनालयाचे नामकरण करण्याची सूचना मांडली. त्यानुसार डॉ. यतिन जाधव यांच्या मातोश्री श्रीमती विभा अरविंद जाधव व वडील कै. अरविंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयाचे नामकरण ‘विभा अरविंद ग्रंथालय’ असे करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश काणे यांची एकमताने निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ. वैशाली जाधव, कार्यवाहपदी विजय कदम, कोषाध्यक्षपदी विनायक ओक यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्रसाद रिसबुड, प्रा. विकास मेहेंदळे, डॉ. राजश्री सोमण, गौरी भोसले, मेघा बेटकर, प्रकाश गांगण आणि सुरेश चव्हाण यांचा समावेश करण्यात आला.
सभेच्या शेवटी मावळते अध्यक्ष गिरीश बांदिवडेकर यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करत उपस्थित सभासद, मान्यवर आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
या सभेला डॉ. अरविंद पोतदार, सुनील खेडेकर, सतीश विरकर, राष्ट्रपाल सावंत, डॉ. माधव सोमण यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.











