कापसाळ येथील सारनाथ बुद्ध विहाराचा आज १४ वा वर्धापन दिन
चिपळूण : शहरालगतच्या कापसाळ येथील सारनाथ बुद्ध विहाराचा १४ वा वर्धापन दिन आज बुधवार दिनांक ६ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षक समिती, चिपळूण विभाग क्रमांक १, मौजे कापसाळ शाखा क्रमांक १४ तसेच माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधत विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. स्थानिक शाखेचे अध्यक्ष रमण मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले असून सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर त्रिसरण, पंचशील आणि बुद्ध पूजापाठ होणार आहे.
सायंकाळी ५ वाजल्यापासून संगीत खुर्ची, चमचा-गोटी यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार असून रात्री १० वाजता मुलांचे रेकॉर्ड डान्स सादर होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून खेर्डी जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्य रावीताई सतीश मोरे उपस्थित राहणार आहेत. या वर्धापन दिनानिमित्त परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











