वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मृतदेह
ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड–पालोजी बाग परिसरातील वाशिष्ठी नदीपात्रात एका सुमारे ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचा वर्ण गोरा असून केस काळे आहेत. त्याची उंची अंदाजे ५ फूट २ इंच असून बांधा मध्यम आहे. मृत व्यक्तीने काळ्या रंगाची ट्रॅक पँट परिधान केलेली आहे.
सदर व्यक्ती ओळखीचा असल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे करीत आहेत.











