अमर रहे, अमर रहे अजितदादा अमर रहे!

पुणे : बारामतीत विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर बारामतीत अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. पवार कुटुंब, नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. लाखोंचा जनसमुदाय बारामतीत जमला. ‘अमर रहे, अमर रहे… अजितदादा अमर रहे’ च्या घोषणानी परिसर गहिवरून गेला. पवार कुटुंबीयांसह महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभर शोककळा पसरली आहे. दादांच्या अकाली निधनानंतर त्यांच्याप्रति समाजात उमटलेल्या काही निवडक प्रतिक्रिया…..

अजित पवार यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक
“अजित पवारजी हे जनतेचे नेते होते, ज्यांचा तळागाळातील लोकांशी घनिष्ठ संबंध होता. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात अग्रेसर असलेले एक मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींची त्यांची समज आणि गरीब व वंचित लोकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळ उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती.”

नरेंद्र मोदी, पंतप्रधान
राजकारण नाही, हा निव्वळ अपघात
अजित पवारांचे जाणे हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तुत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती आहे, अशा व्यक्तीला आज महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात, असे नसते. या अपघाताच्या मागे राजकारण आहे, अशी भूमिका काहींनी मांडली गेली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे.’
शरद पवार
“महाराष्ट्राच्या विकासाचा आधारवड हरपला”
“अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुःखद विमान अपघातामुळे मी व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. या गहन दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना सामर्थ्य आणि धैर्य मिळो, अशी प्रार्थना करतो.”
नितीन गडकरी,
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला
दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. अजित पवारांचं जाणं हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही आहोत.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
माझा मोठा भाऊ हरपला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री











