चिपळूण बाजारपेठ दुपारी २ नंतर राहणार बंद
चिपळूण व्यापारी महासंघटना व एकता व्यापारी संघटनेचा निर्णय
चिपळूण : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद चिपळूण शहरातही उमटले असून या दुःखद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण व्यापारी महासंघटना व एकता व्यापारी संघटना यांनी संयुक्त बैठक घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीत अजितदादांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व या दुःखद घटनेचा आदर राखण्यासाठी आज चिपळूणमधील संपूर्ण बाजारपेठ दुपारी २ वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व व्यापारी बांधवांना या बंदमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी एकजुटीने या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे आज दुपारनंतर चिपळूण बाजारपेठेतील सर्व दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहणार असून शहरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
या संयुक्त आवाहनावर चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष किशोर रेडीज व एकता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच कार्याध्यक्ष अरुण भोजने, कांता चिपळूणकर, संदीप लवेकर, सचिव उदय ओतारी आणि सल्लागार बापू काणे, उमेश काटकर यांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अजितदादांच्या निधनाने राज्याने एक प्रभावी नेतृत्व गमावले असून चिपळूण शहरातील व्यापारी वर्गानेही या दुःखद घटनेबद्दल संवेदना व्यक्त करत बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.












