राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्डे अखेर भरले!
साहिल पवार यांच्या पाठपुराव्याला यश
चिपळूण : शहरातील रॉयल नगर परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः दुचाकीस्वारांच्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा कार्यकर्ते साहिल सुरेश पवार यांनी आपल्या रॉयल नगर प्रभागातील सहकाऱ्यांसह दि. १३ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान महामार्गावरील खोदकामामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले होते. अवघ्या तीन दिवसांतच खोदकामाच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. विशेषतः सर्व्हिस रोड बाजूला खोदकाम केलेल्या ठिकाणी तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.
या पाठपुराव्याची दखल घेत महामार्ग प्रशासनाने तत्काळ हालचाल करत धोकादायक ठिकाणी सुरक्षा सूचना फलक (सावधानता पत्रे) लावले असून उड्डाणपुलाखाली सिमेंटचे पिलर आणि सर्व्हिस रोड दरम्यान केलेल्या खोदकामाचे खड्डे दिरंगाई न करता अवघ्या तीन दिवसांत पूर्णपणे भरून काढण्यात आले आहेत.
यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून साहिल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यक्षम पाठपुराव्यामुळे प्रमुख दोन मागण्या यशस्वीरीत्या मान्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.











